महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा; कोल्हापुरात प्रवीण दरेकरांची टीका

कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महाराष्ट्रात खून, बलात्कार, सामूहिक अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. राज्यभरात फिरत असताना यावर आवाज उठवला, मात्र त्याबाबत कुठलेही नियंत्रण राज्य सरकारकडून आणलेले दिसत नाही, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Feb 11, 2021, 4:14 PM IST

कोल्हापूर- राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महाराष्ट्रात खून, बलात्कार, सामूहिक अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. राज्यभरात फिरत असताना यावर आवाज उठवला, मात्र त्याबाबत कुठलेही नियंत्रण राज्य सरकारकडून आणलेले दिसत नाही. पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर होते की काय? असा प्रश्नदेखील मला पडत आहे. पुण्यातील त्या युवतीची आत्महत्या कोणत्या कारणांमुळे झाली, त्याची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. ते आज कोल्हापुरात बोलत होते.

दरेकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सकाळी दहा वाजता करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने चांगले दिवस येऊ देत. कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य माणूस पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. आर्थिकदृष्ट्या वाईट स्थिती झाली आहे. अशा परिस्थितीत हे सरकार मोठ्या लोकांना गोंजारत आहे. बांधकाम व्यावसायिकांची 50 टक्के फी कमी करत आहे. दारूवरील कर कमी करत आहे. म्हणजेच मोठ्या लोकांचे चोचले पुरवत असताना सर्वसामान्य माणसांना वेठीस धरण्याचे काम करत आहे. या सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे मी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घातले आहे, असे दरेकर म्हणाले.

जुलमी पद्धतीने कोणाचाही वीज पुरवठा खंडित करू नका

पश्चिम महाराष्ट्रात 14 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना वीज खंडित करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र, दहा महिने बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असायला हवेत. कारण कोरोनामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडली आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला असेल, व्यापाऱ्यांचा उद्योग झाला नसेल तर ते बिल कुठून भरणार? असा प्रश्न देखील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. त्यामुळे हे सरकार संवेदनशील आहे. जुलमी पद्धतीने कोणाचाही वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. त्या संबंधित सरकारला सुबुद्धी येऊ व अशी अपेक्षा दरेकर यांनी व्यक्त केली.

...यासाठी भाजप पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल

यापूर्वी शिवसेनेची शाखा असलेल्या देवीपाडा या ठिकाणी सहाशे रुपये वीज बिल येत होते. मात्र, आता त्याच कार्यालयाचे बिल त्यांना आता एक लाख सहा हजाराचे येत आहे. ही बिले चुकीची येत आहेत हे शिवसेनेच्या निदर्शनास आणून दिले आहे. तर एका बाजूला सर्वसामान्य जनतेचा वीज पुरवठा खंडित करत आहेत. तर दुसरीकडे तुमच्या कार्यालयांना मुभा दिली आहे का? असा सवाल देखील दरेकर यांनी केला. सर्वसामान्य ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करत असाल तर हा न्याय सर्वांना समान असला पाहिजे. भेदभाव राज्य सरकारने करू नये, सरकारने मूठभर लोकांसाठी काम करू नये, असा सल्ला देखील दरेकर यांनी दिला. केवळ महाविकास आघाडी टिकवणे हेच सरकार करत आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेचे काय चाललंय? याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला. सर्वसामान्य ग्राहकांची वीजबिल माफ व्हावे, यासाठी भाजप पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील प्रवीण दरेकर यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details