कोल्हापूर -कोरोनामुळे गेली 2 वर्षे बंद असलेला कुंकुमार्चन सोहळा आज अनेक दिवसानंतर संपन्न झाला. ( Kunkumarchan Program Kolhapur Ambabai ) या सोहळ्याला तब्बल 5 हजारांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराबाहेर ( Shri Ambabai Temple Kolhapur ) असलेल्या भवानी मंडप परिसरात हा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण परिसरात महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती त्याच्या मूळ जागी स्थापन होऊन 300 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट च्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर यंदाचे हे सहावे वर्ष आहे.
• पाच हजारपेक्षा जास्त महिला सहभागी -
कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित केलेला सौभाग्य व सौख्यदायी श्री कुंकुमार्चन सोहळा आज रविवार श्रीअंबाबाई मंदिरातील पूर्व दरवाजा ते भवानी मंडप परिसरात संपन्न झाला. या सामुदायिक उपासनेत ५००० पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या. यामध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली कोकणभाग व सीमा भागातूनही अनेक महिला पहाटे पासूनच मंदिर परिसरात उपस्थित होत्या. गेल्या ६ वर्षांपासून अंबाबाई मंदिरात हा सोहळा पार पडला जातो. मात्र, गेली 2 वर्षे कोरोना संसर्गमुळे हा सोहळा होऊ शकला नव्हता. यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. तसेच यावेळी ५००० महिलांमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून ५ भाग्यवान सुहासिनींना सोन्याची नथ, ५ भाग्यवान सुहासिनींना फेशीयल किट, २१ सुहासिनिंना पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आले.