कोल्हापूर - देशाचा अर्थसंकल्प जाहीर होत असतो तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाचे त्याकडे लक्ष लागून राहिलेले असते. प्रत्येकालाच अर्थसंकल्पामधून आपल्यासाठी काहीतरी चांगल्या घोषणा होतील, असे वाटत असते. कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिकांच्या सुद्धा नजरा आता सोमवारी जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागल्या असून त्यांनी सुद्धा काही अपेक्षा केल्या आहेत. सोमवारी 1 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत, त्यांच्याकडे नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीने कोल्हापुरात हा व्यवसाय सुरू आहे पाहुयात..
कोल्हापूर आणि येथील चप्पल व्यवसाय :गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात चप्पल व्यवसाय सुरू आहे. कोल्हापूरची आण, बाण आणि शान म्हणून 'कोल्हापुरी चप्पल'कडे पाहिले जाते. शहरात जवळपास साडेतीन हजार तर जिल्ह्यातील वीस हजाराहून अधिक कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत. 'कोल्हापूर चप्पल'ची महाराष्ट्रासह देशभरात आणि आता जगभरात सुद्धा एक वेगळी ओळख आहे. मात्र, या व्यवसायासमोर अनेक संकटे असल्याने येथील व्यावसायिकांना मोठी चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे हा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी आणि त्याहून अधिक व्यवसाय वाढीसाठी शासनाने पावले उचलण्याची गरज असल्याच्या भावना व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत. शिवाय सोमवारी 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सुद्धा त्यांच्या नजरा लागून राहिल्या असून आपल्या व्यवसायाच्या फायद्याच्या काही घोषणा यामध्ये होतात का? याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रशिक्षण केंद्राची मागणी :कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय सुरू आहे. प्रत्येक पिढीने हा व्यवसाय जपला आणि वाढवला सुद्धा. मात्र, सध्याची पिढी या व्यवसायाकडे अनेक कारणांमुळे वळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केवळ पर्यटकांवर अवलंबून असणारा हा व्यवसाय जगभरात पोहोचावा, यासाठी प्रयत्न होत नाहीत. या व्यवसायात नवीन पिढी सुद्धा यावी यासाठी एका प्रशिक्षण केंद्राची सुद्धा उभारणी करण्याची गरज असल्याचे येथील व्यावसायिकांनी म्हटले आहे. कारागिरांची कमतरता असल्याने व्यवसाय सुद्धा मर्यादित राहिला असून त्याला अधिक चालना देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राद्वारे अनेक कारागीर तयार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
निर्यात वाढविण्यासाठी 'हे' करण्याची गरज :कोल्हापुरात अंबाबाई दर्शनासाठी देशासह जगभरातील भाविक येतात. बाहेर देशातून आलेले पर्यटकसुद्धा याठिकाणी कोल्हापुरी चप्पल न चुकता घेऊन जात असतात, असे येथील व्यावसायिक म्हणतात. त्यामुळे हा व्यवसाय वाढविण्याची गरज असून निर्यात वाढवली तर नक्कीच या व्यवसायाला मोठी चालना मिळू शकते. स्वतः केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विट करत हा व्यवसाय वाढविण्यासाठी देशातील पंचतारांकित हॉटेलसोबत करार करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. देशातील हॉटेलांसोबत करार करून कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी ठेवल्यास जवळपास 7 हजार 500 कोटींपर्यंत हा व्यवसाय वाढू शकतो असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे येथील व्यावसायिकांनी सुद्धा या संकल्पनेचे स्वागत केले होते. मात्र, पुढे या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिले नसल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
चर्मकार समाजासाठी शासनाने लक्ष द्यावे :चर्मकार व्यावसायासाठी शासनाने काहीही लक्ष दिले नाहीये. येथील व्यवसाय केवळ पर्यटकांवर अवलंबून न ठेवता त्याची बाहेरच्या राज्यात सुद्धा निर्यात करण्यासाठी काही योजना आखणे गरजेचे आहे. तसे केल्यास नक्कीच या व्यवसायाला चालना मिळू शकते. शिवाय मागणी वाढल्याने येथे आणखी उद्योजक तयार होतील, असेही व्यावसायिकांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे या व्यवसायावर मोठे आर्थिक संकट :टाळेबंदीचा सर्वाधिक फटका कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिकांना सुद्धा बसला. खरेतर पर्यटनावर अवलंबून असणारे येथील व्यावसायिक तब्बल 7 ते 8 महिने व्यवसाय बंद ठेऊन बसले होते. अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक येत असतात. या पर्यटकांवरच चप्पल व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने पर्यटक सुद्धा येऊ शकले नाहीत. त्यामुळे या व्यवसायाला कोट्यवधींचा फटका बसल्याचे येथील व्यावसायिकांनी म्हटले.