कोल्हापूर - कोरोनाच्या लढाईमध्ये जिल्ह्यातील सीए व्हाट्सअॅप ग्रुप सुद्धा मदतीसाठी पुढे आला आहे. कोरोनासाठी नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या रुग्णालयासाठी या ग्रुपच्या माध्यमातून अडीच लाख रुपये जमा करण्यात आले. या रक्कमेतून एकूण 25 फॉलर बेड आज कोल्हापूरचे महापौर निलोफर आजरेकर, महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन नितल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
कौतुकास्पद ..! कोल्हापुरातील सीए ग्रुपकडून कोरोनासाठी बनविण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी 25 फॉलर बेड
सीए व्हाट्सअॅप ग्रुपकडून कोरोनासाठी बनविण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी 25 फॉलर बेड देण्यात आले. यासाठी 177 सीए आणि काही विद्यार्थ्यांनी सुद्धा हातभार लावल्याने ही मदत करणे शक्य झाले.
काही दिवसांपूर्वी ग्रुपच्या सदस्यांनी आपल्यालाही काही मदत करायची असल्याची कल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना सांगितली होती. त्यानंतर बेड ची गरज असल्याचे समजताच ग्रुपमधील प्रत्येकाने पुढे येऊन मदत गोळा केली. यामध्ये एकूण 177 सीए आणि काही विद्यार्थ्यांनी सुद्धा हातभार लावल्याने ही मदत करणे शक्य झाले. ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी सामाजिककार्य सुरू असते. समाजातील इतर घटकांनी सुद्धा अशाच पद्धतीने शक्य तितकी मदत प्रशासनाला आणि गरजू लोकांना करावी, असे आवाहन सुद्धा ग्रुपच्या सदस्यांनी केले आहे.
महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सुद्धा या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांनी पुढे येऊन अशा प्रकारे मदत करावी जेणे करून आम्हाला आरोग्याच्या अधिक चांगल्या सोयी देता येतील असे आवाहन केले. या उपक्रमात व्हाट्सअॅप ग्रुपचे सीए नितीन हरगुडे, सीए नीलेश भालकर, सीए राघवेंद्र बकरे, सीए तुषार पाटील, सीए विवेक माळवे, सीए अलोक शहा, सीए चेतन मिरजकर, कोल्हापूर सीए शाखेचे अध्यक्ष अनिल चिकोडी यांनी पुढाकार घेतला.