महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 18, 2021, 6:42 PM IST

Updated : Mar 18, 2021, 10:11 PM IST

ETV Bharat / state

सचिन वाझेंचा प्रवास...! कोल्हापूर ते 'चकमकबाज' पोलीस अधिकारी

राज्यात सध्या एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे सचिन वाझे.. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार तसेच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कथित सहभागामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, एकेकाळी शांत, संयमी वाझे पुढे जाऊन चकमकबाज पोलीस अधिकारी कसे बनले आणि कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यात 'युटर्न' आले याबाबतचा हा विशेष रिपोर्ट..

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर- सचिन वाझे यांचे बालपण तसेच महाविद्यालयीन जीवन कोल्हापुरातच गेले आहे. अजूनही कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधील अर्धा शिवाजी पुतळा परिसरात त्यांचे जुने घर आहे. उंचच्या-उंच इमारतींच्यामध्ये त्यांचे कौलारू छोटेसे घर आहे. मात्र, त्याठिकाणी सद्या कोणीही राहत नसून घराला कुलूप लावण्यात आले आहे. घराबाहेर वाझे नावाची एक पाटी लावण्यात आली आहे.

कोल्हापुरातील सचिन वाझेंच्या घराजवळचा परिसर

वाझे यांनी वाणिज्य महाविद्यालयामधून शिक्षण घेतले आहे. शाळेत, महाविद्यालयामध्ये ते सर्वांचे लाडके असायचे, असे त्यांचे मित्र सांगतात. शिवाय खेळाबद्दल त्यांना प्रचंड आवड होती. आपल्या मित्रांना घेऊन ते नेहमी मैदानात खेळायला जायचे. महाविद्यालयीन जीवनात त्यांना क्रिकेटचे प्रचंड वेड होते. 1985 ते 90 पर्यंत त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलेले जनार्दन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते उत्कृष्ठ फलंदाज तसेच यष्टीरक्षक होते. क्रिकेटचे वेड तर होतेच शिवाय क्रिकेट खेळत असताना सर्वांना शिस्तीबाबत ते सतत सांगत असायचे, स्वभाव संयमी होता. सर्वांशी मिळून-मिसळून असायचे. कोल्हापुरातील मराठा स्पोर्टिंगमध्ये ते खेळायचे नंतर तोच क्लब पुढे शाहुपुरी जिमखाना क्लब झाला, असे यादव यांनी सांगितले. त्यांचा भाऊ सुधर्म वाझे हे सुद्धा उत्कृष्ठ क्रिकेटपट्टू आहेत. त्यांच्यासोबतच सचिन वाझे नेहमी खेळायला जात असत.

1990 साली सहायक पोलीस निरीक्षक म्हणून रूजू

महाविद्यालयीन जीवनानंतर क्रिकेट बरोबरच स्वतः एक पोलीस अधिकारी व्हायचे त्यांचे स्वप्न होते. पुढे जाऊन त्यांनी ते पूर्ण केले. 1990 साली त्यांची सुरुवातीला गडचिरोली येथे सहायक पोलीस निरीक्षक पदावर नेमणूक झाली. त्यांनी त्याठिकाणी चांगले काम केले. पुढे जाऊन त्यांची ठाण्यामध्ये बदली झाली. हळूहळू वाझे यांचे पोलीस दलामध्ये नाव होत गेले आणि त्यानंतर त्यांनी पाठीमागे वळून पाहिलेच नाही. या सर्व धावपळीत त्यांनी कोल्हापूरकडेही पाठ केली. आजही अनेक शेजारी त्यांना आम्ही पाहिलेच नाही, असे सांगतात. विशेष म्हणजे, आईच्या निधनानंतरही ते कोल्हापुरात अंत्यसंस्कारासाठी आले नसल्याचे बोलले जाते.

सगळं काही सुरळीत सुरू होतं मात्र...

2002 पर्यंत सचिन वाझे यांच्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरू होते. नाव कमावले होते, समाजात चांगली प्रतिष्ठा होती. मात्र 2002 साली घाटकोपरमध्ये बॉम्बस्फोट झाला. यासंदर्भात परभणीमधील 27 वर्षीय ख्वाजा युनूस याला अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात पोलीस तपासासाठी औरंगाबाद येथे आरोपी ख्वाजा युनुसला घेऊन जात असताना वाहनाचा अपघात झाला. पोलीस नोंदीनुसार ख्वाजा युनूस अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. अजूनही या ख्वाजा युनूसचा तपास लागलेला नाही. मात्र, सचिन वाझे यांनी त्याला चकमकीत मारले असल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना चकमकबाज अधिकारी म्हटले जाऊ लागले आणि सचिन वाझे यांच्या आयुष्यात एक 'यु टर्न' आला. यामध्ये एका प्रकरणात त्यांचे 2008 साली निलंबन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, राजकारणात ते सक्रिय झाले नाहीत, शिवसेनेत प्रवेश जरी केला असला तरी शिवसेनेत उघडपणे कुठेही पाहायला मिळाले नाहीत.

वाझेंच्या आयुष्यातील नवी सुरुवात

2008 साली निलंबन केल्यानंतर वाझे यांनी स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला होता. मात्र, असे काही झाले आणि पुन्हा एकदा सचिन वाझे यांच्या आयुष्यात एक नवी पहाट झाली. महाविकास आघाडीचे सरकार आले आणि वाझे यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेत थेट गुन्हेगारी तपास पथकाच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर त्यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची झाडाझडती सुरू केली. तसेच 'टीआरपी' घोटाळ्याप्रकरणी अर्णव गोस्वामी यांच्या घरात घुसून त्यांना वाझे यांनी ताब्यात घेतले. त्यामुळे पुन्हा वाझे यांचे नाव चर्चेत आले. तर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणी तसेच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी तेच जबाबदार असल्याचे त्यांच्यावर आरोप झाला असून आता पुन्हा एकदा त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

कोणीही बोलायला तयार नाही

वाझे यांच्या सतत वाचायला आणि पाहायला मिळत असलेल्या बातम्यांमुळे शिवाजी पेठेमधील घराशेजारचा एकही शेजारी त्यांच्याबाबत समोर येऊन माहिती देत नाही. वाझे यांचे घर बरेच दिवस बंद आहे, असेच सांगतात. शिवाय शेवटचे कधी पाहिले हे सुद्धा आठवत नसल्याचे काहीजण सांगतात.

Last Updated : Mar 18, 2021, 10:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details