कोल्हापूर- तिसरी लाट येईल का? आणि आली तर जिल्ह्यातील लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल या विषयी सध्या अंदाज आहेत. पण आपण सावध असले पाहिजे, त्या दृष्टीने तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रूग्णांलयानी सज्ज रहावे, तसेच यासाठी लागणारा कृती आराखडा येत्या बुधवारपर्यंत तयार करावा. असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. जिल्ह्याधिकारी कार्यालयात बालरोग तज्ज्ञांच्या दूरदृष्यप्रणाली व्दारे (व्ही. सी) आयोजित करण्यात आला होता यामध्ये आढावा बैठक घेण्यात आली.
पालकमंत्री सतेज पाटील यांची आढावा बैठक
आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार साधारण जिल्ह्यातील 40 लाख लोकसंख्येपैकी 18 वर्षाखालील युवक, युवतींची संख्या अंदाजे 10 लाख इतकी आहे. पालकमंत्री म्हणाले की या मुले, मुलींची संख्या शिक्षण विभागाच्या सहाय्याने निश्चित करण्यात यावी. आरोग्य विभागाने गाफील न राहता संभाव्य तिसऱ्या लाटेचे सूक्ष्म नियोजन करावे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे 200 आयसीयु बेड लागतील. या करिता जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात अनुक्रमे 50 तर खासगी रुग्णालयात 150 व्हेंटीलेटर बेड तालुकानिहाय निश्चित करण्यात येणार असून यामध्ये 10 ऑक्सिजन तर 2 व्हेंटीलेटर बेडचा समावेश असेल, आरोग्य कर्मचारी व डाॅक्टर यांनी मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाहीतर आश्वस्त करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.