महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूरच्या जवानाचा कर्तव्य बजावताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

गिरगाव (ता. करवीर) येथील जवान सुरज साताप्पा मस्कर (२३) यांचा आसाममधील डिंजान येथे सेवा बजावताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे मृत्यू झाला.

सुरज मस्कर

By

Published : Mar 23, 2019, 8:22 PM IST

कोल्हापूर - गिरगाव (ता. करवीर) येथील जवान सुरज साताप्पा मस्कर (२३) यांचा आसाममधील डिंजान येथे सेवा बजावताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे मृत्यू झाला. सैन्य प्रशासनाकडून आज सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना ही माहिती कळविण्यात आली. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सैन्यात सेवा बजावत असताना मृत्यू झाल्याची गिरगावातील ही पहिलीच घटना आहे. मस्कर कुटुंबाची तिसरी पिढी सैन्य सेवेत आहे. सुरजचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावात झाले. त्यानंतर त्याने १२ वी पर्यंतचे शिक्षण आंबोली येथे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अवघ्या १८ वर्षी ते सैन्यात भरती झाले. २ वर्षांपूर्वी त्यांचा गावातीलच रेवती जाधव यांच्याशी विवाह झाला होता.

सध्या ते ११० बॉम्बे इंजिनियरिंग बटालियनमध्ये कार्यरत असून आसाम मधील डिंजाल येथे सेवा बजावत होते. मात्र, आज पहाटे ते सहकाऱ्यांसह सेवा बजावत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले मात्र, तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. सकाळी ७ च्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच मस्कर कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गाव दुःखाच्या छायेत असून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. सोमवारी त्याचे पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details