कोल्हापूरKolhapur Shivaji University Got Patent : आपल्या दिवसाची सुरुवात ज्या गोड पेयापासून होते, ते पेय म्हणजे चहा. त्या चहातील शिजवलेली चहापत्ती टाकाऊ पदार्थ म्हणून गणली जाते. मात्र कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी याच चहापत्तीवर संशोधन केलं. या चहापत्तीपासून कार्बन डॉट्स नॅनो संयुग तयार करण्याचं संशोधन केलंय. या संशोधनाचा उपयोग शेती उत्पन्न वाढवण्यासाठी होणार आहे, विद्यापीठाच्या संशोधनाचा बळीराजालाच फायदा होणार असल्यानं या संशोधनाने शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
संशोधन पर्यावरणपूरक :स्वयंपाकघरात चहा बनवल्यानंतर शिल्लक चहापत्ती टाकून देण्यात येते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्रज्ञ वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जी.बी कोळेकर आणि डॉ. रविंद्र वाघमारे यांनी या टाकाऊ चहापत्तीपासून कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल तयार केले आहेत. हे संशोधन पर्यावरणपूरक तसंच कमी खर्चिक आहे. तसंच शाश्वत शेतीस उपयुक्त ठरणारं आहे. शिवाजी विद्यापीठात 2017 सालापासून सुरू असलेल्या या संशोधनामुळं पिकं जोमाने फोफावतात, मुळेही जोर धरतात. तसंच बियाणांची उगवण क्षमताही वाढलीय, असं निरीक्षण या अभ्यासकांनी नोंदवलंय.
जिरायती शेतीसाठी अधिक उपयुक्त :शिजलेल्या चहापत्तीवर रिसर्च संशोधन केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी या नॅनो मटेरिअलचा मेथींच्या बियांवर प्रयोग केला. या प्रयोगादरम्यान पमेथींच्या बियांनी अधिक पाणी शोषूण घेतलं. तसंच या बियांची उगवणक्षमता वाढल्याचं लक्षात आलं. एवढंच नव्हे, तर या मटेरिअलच्या वापरानंतर मेथीच्या रोपट्यांची मुळंही अधिक जोमानं वाढल्याचं दिसून आलं. मुळांबरोबरच मेथीचे रोपटेही तितक्याच जोमानं वाढत असल्याचं संशोधकांच्या लक्षात आले. संशोधकांनी तयार केलेले कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल सोल्यूशन पूर्णतः सेंद्रिय आहे. सर्व प्रकारच्या पिकांसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असल्याने जिरायती शेतीसाठी ते अधिक उपयुक्त ठरू शकते. (Kolhapur Shivaji University)
पिकांची वाढ अधिक गतीने :गेल्या सहा वर्षांपासून शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. जी.बी. कोळेकर आणि डॉ. रविंद्र वाघमारे यांनी या संशोधनासाठी कष्ट घेतलेय. या द्रव्यांची पिकांवर फवारणी केल्यास पिकांची वाढ अधिक गतीनं होण्यास मदत होते. सर्व प्रकारच्या पालेभाज्या तसेच फळभाज्यांवरही याची फवारणी करणं सहजशक्य आहे. संशोधनाच्या चाचण्या प्रयोगशाळेबरोबरच प्रत्यक्ष शेतामध्येही घेण्यात आल्या (tea leaves for crop growth) आहेत.