कोल्हापूरKolhapur Robbery :लग्न समारंभासाठी बेळगावहून कोल्हापुरात आलेली एक महिला नातेवाईकांसोबत फोटो काढण्यासाठी काही सेकंदासाठी पर्स ठेवून बाजूला गेली आणि 35 तोळ्यांच्या दागिन्यांना मुकली. लग्न समारंभात वऱ्हाडी म्हणून आलेल्या चोरट्याने पर्समधील सुमारे 35 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख 8 हजार आणि मोबाईल असा सुमारे 24 लाख रुपये किमतीचा ऐवज हातोहात लांबवला. सोमवारी शिरोली नाक्याजवळील एका मंगल कार्यालयात ही चोरीची घटना घडली. (Kolhapur purse theft incident)
अज्ञात चोरट्याने लांबवली पर्स :पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सोमवारी रात्री कोल्हापुरातील शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभासाठी बेळगाव येथील केतन नंदेशवन हे कुटुंबीयांसोबत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्वागत समारंभात फोटो काढण्यासाठी गेले. केतन यांच्या आई मीना यांनी त्यांच्या पायाजवळ पर्स ठेवली आणि फोटो क्लिक व्हायच्या आतच अवघ्या काही सेकंदात ही पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. फोटो काढून येताच हा प्रकार नंदेशवन यांच्या ध्यानात आला. यानंतर सर्वांनी शोधाशोध केली पण उपयोग झाला नाही. या पर्समध्ये सुमारे 35 तोळ्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल होता.
सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध :लग्न समारंभातील चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी आणि नातेवाईकांनी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीसीटीव्हीमध्ये हा चोरटा सूटबुटामध्ये येऊन चोरी करून गेल्याचं निदर्शनास येत आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची बाजारभावाप्रमाणे किंमत २४ लाख रुपये इतकी आहे; परंतु पोलीस रेकॉर्डवर १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या चोरीची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.