कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस कोल्हापूर :गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 38 फुटावर पोहोचली आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला तीन दिवसांचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी राधानगरी, पन्हाळा, भुदरगड चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 105 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
इचलकरंजीतील लहान पूल पाण्याखाली :कोल्हापुरातील राजाराम बंधारा येथे आज सकाळी सात वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 2 इंचावर पोहोचली. त्यामुळे आता पंचगंगा नदी धोका पातळीकडे मार्गक्रमण करत आहे. आता पूर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. पंचगंगा नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पाणी पातळी 62 इंचावर पोहोचली. यामुळे इचलकरंजी-रेंदाळ हुपरी मार्गावरील लहान पोल पाण्याखाली गेला आहे. नदीकिनारी असलेली गणपती मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहे.
राधानगरी धरणात 88 टक्के पाणीसाठा :राधानगरी धरण पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून राधानगरी धरण 88 टक्के भरले आहे. पाऊस कायम राहिल्यास मंगळवारी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाजे सुरू होतील, असा अंदाज पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
एकूण 15 मार्ग वाहतुकीसाठी बंद :कोल्हापूरजिल्ह्यातील एकूण 24 पैकी 5 राज्यमार्गावर पाणी आल्यामुळे ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर 122 प्रमुख जिल्हा मार्गांपैकी 10 मार्गही वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. एकूण 15 मार्ग बंद करण्यात आले आहेत. निपाणी देवगड मार्गावरील मुरगुड शहराततील स्मशानभूमी जवळ पंचगंगा नदीचे पाणी आले. त्यामुळे हा राज्य मार्गही बंद झाला आहे. सध्या मुरगुड-निढोरी मार्गावरील या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे.
हेही वाचा :
- Maharashtra Weather Today : पुणे, कोल्हापूरसह या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, विदर्भात पावसाचा धुमाकूळ
- Heavy Rainfall in Thane : ठाणे जिल्ह्यात मुसळधार; बेजबाबदार नागरिकांची लहान मुलांसह धबधब्यांवर गर्दी
- Heavy Rainfall in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर