महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारतचा दणका; ऑनलाईन कॅसिनो अड्ड्यावर छापा, मास्टरमाईंड शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

विन लकी गेम नावाने जिल्ह्यात सुरू असणाऱ्या कॅसिनोवर इचलकरंजी येथील अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करून जुगार अड्डा चालकाला अटक करण्यात आली.

कोल्हापूरा ऑनलाईन कॅसिनो अड्ड्यावर छापा

By

Published : Oct 7, 2019, 12:49 PM IST

Updated : Oct 7, 2019, 4:30 PM IST

कोल्हापूर - 'विन लकी गेम' नावाने कोल्हापूरसह जिल्ह्यात ऑनलाईन कॅसिनोने चांगलेच आपले पाय रोवले आहेत. दररोज कोट्यवधींची उलाढाल या ऑनलाईन गेमच्या नवीन जुगारामुळे जिल्ह्यात होत आहे. पोलिसांना या अवैद्य धंद्याबद्दल माहिती असूनही कारवाई का होत नाही? असा सवाल काही नागरिक करत आहेत. याबाबतची बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केली होती. बातमीनंतर अनेक ठिकाणचे हे ऑनलाईन कॅसिनो सेंटर बंद झाले असून सुरू असलेल्या इचलकरंजी येथील एका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यामध्ये अड्ड्यावरील सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करून ऑनलाईन जुगार अड्डा चालक अभिजित शिंदे याला अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी हे ऑनलाईन जुगार अड्डे सुरू असून त्यांचा शोध घेऊन याच्या पाठीमागचा मास्टरमाईंड कोण आहे? शिवाय हे अवैध धंदे कोणाच्या पाठबळावर सुरू आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे.

कोल्हापुरात ऑनलाईन कॅसिनो अड्ड्यावर छापा

असा खेळला जातोय हा ऑनलाईन जुगार -

जिल्ह्यात 50 हुन अधिक ठिकाणी ऑनलाईन कॅसिनो हा नवा जुगाराचा धंदा जोरात सुरू झाला आहे. विन लकी या ऑनलाईन कॅसिनो गेमच्या माध्यमातून दिवसाकाठी कोट्यवधींची उलाढाल होत आहे. हा ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांना सुरुवातीला एखाद्या कॅसिनोमध्ये गेल्यावर ज्या प्रमाणे पैसे देऊन कॉईन देतात त्या प्रमाणे जेवढ्या पैशाने खेळणार आहे तेव्हढ्याचा बॅलन्स त्या गेमवर दिला जातो. गेममध्ये 0 ते 36 पर्यंतचे असे 37 आकडे असतात त्यातल्या एकापेक्षा जास्त नंबरवर एकाच वेळी आपण पैसे लावू शकतो. यासाठी प्रत्येक राउंडला 40 सेकंद असा यामध्ये वेळ असतो. 40 सेकंदामध्ये आपल्याला वाटतो त्या नंबरवर पैसे लावू शकतो. त्यानंतर आपोआप एक नंबर निघतो तो जर आपण लावलेल्या नंबरसोबत जुळला तर लावलेल्या पैशांच्या नऊ पटीने पैसे आपल्या बॅलन्समध्ये जमा होतात. आपल्याला हवे तेंव्हा हा गेम बंद करून या एजंटकडून आपल्या बॅलन्समधून ही रक्कम घेऊ शकतो. कोल्हापूर शहरातील स्टँड, तावडे हॉटेल, लक्ष्मीपुरी, गांधीनगरसह इचलकरंजी शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात हे जुगार अड्डे सुरू आहेत. शिवाय कोडोली, शिणोळी, वडगाव, आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, जोतिबा, केर्ली, आदी ठिकाणी सुद्धा हे अवैध धंदे सुरू आहेत. या अड्ड्यांचा सुद्धा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. कारण अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे सुद्धा जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा -तांबडा-पांढरा रश्श्यासाठी प्रसिद्ध कोल्हापुरात पाच दिवस मटन-चिकन बंद; सकल मराठा समाजाकडून आंदोलनाचा इशारा

मास्टरमाईंड मंगेश कोण याचा पोलिसांनी शोध घेण्याची गरज -

विन लकी गेम मंगेश नावाच्या एका व्यक्तीकडून जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती समजते आहे. अनेक ठिकाणी त्याने या अवैध धंद्यासाठी आपले एजंट नेमले आहेत. हे सर्व पाहण्यासाठी मंगेशने 'अकबर' नावाच्या व्यक्तीला मॅनेजर म्हणून ठेवले असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी या एजंट बरोबरच या पसरलेल्या जाळ्यामागचा मास्टरमाईंड शोधण्याची गरज आहे.

हेही वाचा - कडकनाथ घोटाळा : जास्त पैसे देण्याचे अमिष दाखवून शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा

विन लकी गेम' प्रमाणेच 'सुपर 7' नावाची सुद्धा गेम काही ठिकाणी सुरू -

'विन लकी गेम' प्रमाणेच 'सुपर 7' नावाच्या गेम सुद्धा काही ठिकाणी सुरू आहेत. संजय नावाचा व्यक्ती हा गेम चालवत असून शहरात त्याची 5 ते 6 दुकानं आहेत. हा गेम सुद्धा अशाच पद्धतीने खेळला जातोय. अशा या ऑनलाईन गेमच्या नावाने ऑनलाईन कॅसिनोचा सुळसुळाट सुरू असून वेळीच या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थांसह नागरिकांकडून होत आहे.

Last Updated : Oct 7, 2019, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details