कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 कोटी 35 लाख 20 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरोडा तपासासाठी गेलेल्या कोल्हापूर पोलिसांच्या हाती हे कोट्यवधी रुपयांचे घबाड लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोने दरोडेखोरांकडून जप्त करण्याची ही कोल्हापूर पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहीती दिली कोल्हापूर येथे राजेंद्र नगर परिसरात लक्ष्मी गोल्ड बुलियन नामक कंपनी आहे. या कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या रोख रकमेसह सोन्याच्या मुद्देमालावर दरोडा टाकल्याप्रकरणी पाच दरोडेखोरांना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ कार्यालयाजवळ एका कारच्या (केए 48 एन 0067) समोर दरोडेखोरांनी दुसरी कार आडवी लावली होती. त्यात दरोडेखोरांनी चिंतामणी पवार, सुशांत कदम, सागर सुतार यांचे अपहरण केले. व त्यांच्या कारमधील हवालाची रोकड व दागिने असा कोट्यवधी रुपयांचा किमती मुद्देमाल लुटला होता.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, दोन कार एकामागून जाताना दिसून आल्या. शिवाजी पुलावरील सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्या रत्नागिरीच्या दिशेने जाताना दिसून आल्या. पोलिसांनी तपास केला असता, संशयित लक्ष्मण पवार याने त्याचा मेव्हणा गुंडाप्पा नंदिवाले, अविनाश मोटे, अक्षय मोहिते, इंद्रजित देसाई यांच्यासह अन्य साथीदारांना हाताशी धरून लुटमार केली. तसेच स्वत:ची कार वापरली असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान अखेर 2 कोटी 35 लाख 20 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये आणखी काही साथीदारांचा समावेश असल्याची शक्यता पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत वर्तविली आहे.
अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे खालीलप्रमाणे -
1) मुख्य सूत्रधार लक्ष्मण अंकुश पवार (वय 26, रा. खटके वस्ती, लिंगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली)
2) गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (26, रा. तमदलगे, ता. हातकणंगले)
3) अविनाश बजरंग मोटे (26, रा. शिवाजी चौक, हातकणंगले)
4) अक्षय लक्ष्मण मोहिते (26, र. आंबेडकर नगर, हातकणंगले)
5) इंद्रजित बापु देसाई (24, रा. हातकणंगले)