कोल्हापूर : कोरोनामुळे एकीकडे जगभरातील सगळ्याच क्रीडा स्पर्धा, विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. मात्र कोल्हापुरातील पन्हाळा येथील एका कोविड केअर सेंटरमध्ये चक्क फुटबॉलची मॅच पाहायला मिळाली. आपले मनोबल वाढवण्यासाठी कोरोना रुग्णांनी वापरलेली ही अनोखी पद्धत आता चांगलीच व्हायरल होत आहे.
पन्हाळा तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 180 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील आता 112 ऍक्टिव्ह रुग्णांना वाघबिळ येथील एकलव्य पब्लिक स्कुलमधील कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. एकूण 112 रुग्णांमध्ये वृद्धांसह तरुण मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. येथील बहुतांश रुग्णांना अद्याप कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. आपण अगदी ठणठणीत बरे असल्याचे हे रुग्ण स्वतःच सांगत आहेत.
कोल्हापूरातील कोव्हिड केअर सेंटर मध्ये पार पडली चक्क फुटबॉल मॅच! काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण भजनामधून स्वतःचे मनोबल वाढवत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, पन्हाळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये चक्क कोरोनाबाधित रुग्णांची फुटबॉल मॅच पाहायला मिळाली. तालुक्यातील ज्या दोन गावांमध्ये कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे त्याच पोर्ले आणि कोतोली गावातील कोरोनाबाधित तरुणांमध्ये हा सामना रंगला. इतर महिला आणि वयस्कर रुग्णांनीही या सामन्याचा आस्वाद घेतला.
या सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, रुग्णांचे कुटुंबीय त्यांची ठणठणीत प्रकृती पाहून समाधान व्यक्त करत आहेत. दरम्यान येथील प्रशासनाकडून सुद्धा रुग्णांची काळजी घेतली जात आहे.
हेही वाचा :...म्हणून पुण्यातील जहांगीर रुग्णालयाचा 'नर्सिंग स्टाफ' रस्त्यावर, सामूहिक राजीनाम्याचा दिला इशारा