कोल्हापूर :गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक सलोखा काही कारणास्तव बिघडला होता. मात्र, तो सलोखा पुन्हा एकदा आबादीत ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. त्यातच कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या नागदेवाडी येथील अनेक वारकरी गेल्या 41 वर्षांपासून पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी नित्यनेमाने करत आहेत. यातच बालिंगा येथील आत्तार कुटुंबीयांनी धार्मिक वसा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. अत्तार यांचे घर आणि दुकान एकच ठिकाणी असल्याने यांच्या दुकानात भजन, कीर्तन आणि चहापान झाल्यानंतरच ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होते.
भक्तीभावाने वारकऱ्यांची सेवा : नागदेववाडी येथून निघालेली भक्तिमय वारी बालिंगा येथील अत्तार कुटुंबीयांच्या येथे पहिला स्टॉप घेते, काही काळासाठी विसावते. या ठिकाणी भजन कीर्तनात अत्तार कुटुंबीय आणि वारकरी रमून जातात. चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढे ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. गेल्या 32 वर्षांपासून अत्तार कुटुंबीय भक्तीभावाने वारकऱ्यांची सेवा करतात. घरात ईद, दिवाळी असा कोणताही सण साजरा करताना ज्या पद्धतीने उत्सव स्वरूपात केला जातो, त्याच पद्धतीने अत्तार कुटुंबीय आषाढी एकादशी सणही साजरा करतात.