कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला लॉकडाऊन आता काही प्रमाणात शिथिल झाला आहे. मात्र, राज्यातील मंदिरे अद्याप बंद ठेवण्यात आली आहेत. परिणामी मंदिर, बस आणि रेल्वे स्थानकांबाहेर वावरणारे फिरस्ते आणि भिकाऱ्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा लोकांसाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि 'एकटी' ही संस्था आधार ठरली आहे. गेले तीन महिने चार निवारा केंद्राच्या माध्यमातून एकूण 134 निराधार लोकांच्या जेवणाची आणि सुरक्षितपणे राहण्याची सोय केली आहे. या ठिकाणी फक्त फिरस्ते, भिकारीच नाही तर लॉक डाऊनमुळे काम गमावलेल्यांचा देखील सांभाळ देखील निवारा केंद्रांमध्ये सुरू आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवहार, व्यवसाय आणि मंदिरेही बंद झाली. याचा फटका मंदिर, रेल्वे स्टेशन, बस स्थानका बाहेर बसून उपजिविका करणाऱ्यांना बसला. शिवाय त्यांच्या अस्वच्छ राहण्यामुळे कोरोना संसर्गाला आमंत्रण मिळण्याची भीती निर्माण झाली. याचाच विचार करून कोल्हापूर महानगरपालिकेने भिकारी, फिरस्ते, निराधार व लॉकडाऊनच्या काळात शहरात अडकलेल्या विक्रेत्यांना एकत्र केले व त्यांच्या निवाऱ्याची आणि खाण्या-पिण्याची सोय केली. यासाठी चार निवरा केंद्रात 134 जणांची सोय केली. या लोकांना कोरोनापासून बचावासाठीची साधनेही पुरवण्यात आली. लॉकडाऊन शिथिल होताच यातील अनेकांना महानगरपालिकेने स्वखर्चाने त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था केली. मात्र, ज्यांना कोणीच नाही अशा निराधार लोकांची आजही महानगरपालिका आणि 'एकटी' ही संस्था करत आहे.
सध्या कोल्हापूरातील चार निवारा केंद्रात 61 जण राहत असून यात 28 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. यासर्वांसाठी दिवसाला तीन ते चार हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. या सर्वांसाठी महिन्याला एक लाख रुपयेपर्यंतचा खर्च कोल्हापूर महानगरपालिका करत आहे. लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्यांसाठी तीन महिन्यात महापालिकेने सात लाखांपेक्षा अधिक खर्च केला आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी याकामात मदतीचा हातभार लावला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवारा केंद्र आणि लोकांची संख्या -