कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांवर आणि स्थानिक नागरिकांवर कारवाई करण्यात सुरवात केली आहे. आज शहरात येणाऱ्या पर्यटकांवर भवानी मंडप येथे कारवाई करण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. यावेळी काही पर्यटकांनी महिला कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. मात्र महिला कर्मचाऱ्यांनी उद्धट वागणाऱ्या पर्यटकांना खडेबोल सुनावले.
कोल्हापूर : विनामास्क पर्यटकांवर कारवाई विनामास्क फिरणाऱ्यांवर महानगरपालिकेची कारवाई
राज्यात अनलॉक प्रक्रियेनंतर मंदिर सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यामुळे राज्यातील पर्यटक करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येत आहेत. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नयेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शहरात आज सकाळपासून विनामास्क फिरणाऱ्यांवर कोल्हापूर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे.
काम नसताना नागरिकांनी बाहेर पडू नये. तसेच, जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घरीच राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने यापूर्वीच केले आहे. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमासाठी केवळ 50 व्यक्तींना परवानगी असून जे नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
कारवाईची चक्रे गतिमान करण्याची गरज
कोल्हापूरात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी ती वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याचे चित्र आहे. तर, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, भाजीपाला मार्केटमध्ये अनेक विक्रेते आणि ग्राहक यांच्या तोंडावर मास्क न लावता वावरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कारवाई पथकांची गस्त वाढवण्याची गरज बनली आहे.