महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 24, 2020, 4:19 PM IST

ETV Bharat / state

कोल्हापुरात आठ महिन्यांनी निघाली वरात; मनसेचा महानगरपालिकेवर अनोखा मोर्चा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अमृत पाईपलाइन योजनेबाबत मनसे आक्रमक झाली आहे. या योजनेचे काम योग्य दर्जाचे होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी कोल्हापूर मनसेने केली आहे.

mns agitation
मनसे वरात

कोल्हापूर - कोरोनामुळे मोठे लग्न समारंभ व वरातीला बंदी असली तरी कोल्हापुरात वाजतगाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत घोड्यावरून वरात निघाली. या वरातीत पोलिसही उपस्थितीत होते. मात्र, या वरातीत नवरदेवच नव्हता! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोल्हापूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात ही वरात काढली होती. अमृत योजनेतील पाईपलाइनची व निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी ही वरात काढण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करावी अन्यथा महापालिकेला टाळे ठोकले जाईल, असा इशारा मनसेने दिला.

मनसेचा महापालिकेवर अनोखा मोर्चा

कोल्हापूर महानगरपालिकेने अमृत पाईपलाइन योजनेचे 115 कोटी रुपयांचे काम 'दास' या खासगी कंपनीला दिले आहे. पावसाळ्यापूर्वी या कंपनीने कोल्हापुरात काम सुरू केले. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पंचनामा करण्यात आला. ज्या पद्धतीने कामाचे टेंडर भरण्यात आले, त्या पद्धतीने काम झाले नसल्याचे निदर्शनास आले. पुराव्यासह याची माहिती मनसेने आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिली होती. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामाला स्थगिती द्यावी व कामाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेने केली होती. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आज मनसेकडून महापालिकेवर वरात मोर्चा काढण्यात आला.

यावेळी महानगरपालिका आयुक्तांचा धिक्कार असो, कंपनीच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, आयुक्त गप्प का? बोला आयुक्त बोला, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. येत्या काही दिवसात याचा खुलासा झाला नाहीतर महापालिकेला टाळे ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा मनसेने दिला. या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, राजू बागवान, कृष्णात दिंडे, राज मकानदार, बबन सावरे, अमित फराकटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

खडी, वाळू, सिमेंटचा रुखवत -

या आंदोलनात वरातीत रुखवत म्हणून वाळू, खडी, सिमेंट, माती हे ठेवण्यात आले होते. हे सर्व महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून पाइपलाइनच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details