महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्ताधाऱ्यांना पराभव दिसत आहे; मुन्ना महाडिकांच्या टीकेला बंटी पाटलांचे प्रत्युत्तर - पालकमंत्री सतेज पाटील धनंजय महाडिक

नागरिकांनी जीवावर बेतेल असे वागू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. मात्र, सत्ताधाऱ्यांना पराभव दिसू लागल्याने ते निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याचा टोला त्यांनी महाडिकांना लगावला.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Apr 17, 2021, 6:20 PM IST

कोल्हापूर- गोकुळच्या ठरावधारकाचा मृत्यू होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. नागरिकांनी जीवावर बेतेल असे वागू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. मात्र, सत्ताधाऱ्यांना पराभव दिसू लागल्याने ते निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याचा टोला पाटील यांनी महाडिकांना लगावला. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

माहिती देताना पालकमंत्री सतेज पाटील

सत्ताधाऱ्यांची पहिल्यापासूनच मानसिकता आहे की, गोकुळची निवडणूक पुढे जावी, कारण सत्ताधारी समर्थपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाहीत. भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे असल्यामुळे त्यांना निवडणूक हरण्याची भीती आहे. त्यामुळेच गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत असल्याची टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली

गोकुळची निवडणूक होऊ नये यासाठी सत्तारूढ गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. सोमवारी गोकुळ निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालय जो निर्णय घेईल तो सर्वांनाच मान्य करावा लागेल, असे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.

गोकुळ दूध संघाच्या ठरावधारकाचा मृत्यू होणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. जीवावर बेतेल इतके नागरिकांनी करू नये. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक सुरळीत पाडली जाईल, याची काळजी घेतली जाईल. यापूर्वी एकाच ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली जायची. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर मतदान घेण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details