कोल्हापूर -कर्नाटक राज्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व बस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा प्रश्नावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. या वादात कन्नड रक्षण वेदिकेनेही गंभीर भूमीका घेतली आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा कन्नड रक्षण वेदिकेने दिला आहे.
याशिवाय 'राजेश पाटील यांना बेळगावमध्ये पाय ठेवू देणार नाही', असेही कन्नड रक्षण वेदिकेने स्पष्ट केले आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचे निर्देशही पोलिसांनी परिवहन महामंडळाला दिले आहेत.