कोल्हापूर -राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या जोतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द करण्यात आल्याने याचा फटका या परिसरातील अनेक लहान मोठ्या व्यवसायिकांना बसला असून, कोट्यावधिची उलाढाल ठप्प झाली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेशसह अन्य राज्यातील लाखो भाविक यात्रेनिमित्त जोतिबाच्या डोंगरावर गर्दी करत असतात. जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. या दिवशी देवाच्या दर्शनासाठी जोतिबा डोंगरांवर लाखो भाविक हजेरी लावत असतात. जोतिबाच्या नावानं चांगभलं ! दख्खनचा राजा जोतिबा माझा म्हणतं देशभरातले भाविक याठिकाणी येतात. गुलाल खोबऱ्याची उधळण करत ढोल आणि हालगीच्या तालावर मशाली नाचवल्या जातात. सासनकाठी नाचवणारे भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र याही वर्षी गेल्या वर्षीप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने जोतिबा डोंगरावर जाणाऱ्या सर्वच वाहनांवर बंदी घातली आहे. शिवाय डोंगराकडे जाणाऱ्या सर्वच मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे डोंगर परिसरात पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
मानकऱ्यांमधील 5 जण कोरोना पॉझिटिव्ह