कोल्हापूर - गोकुळच्या निवडणुकीत पराभवाला घाबरूनच सत्ताधारी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत, असा घणाघात पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी गटाने न्यायालयात केली आहे. त्यावर ते कोल्हापुरात बोलत होते.
गोकुळची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी गोकुळ संघातील सत्ताधार्यांनी उच्च न्यायालयात केली होती. मात्र ही मागणी फेटाळून लावत उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करत गोकुळ दूध संघातील सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर राजर्षी शाहू आघाडीचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ संघातील सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. गोकुळची पंचवार्षिक निवडणूक घ्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र सत्ताधारी गटाने ही निवडणूक होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सत्तारूढ गटाला परिस्थिती अशीच राहू दे असे वाटते. जेणेकरून गोकुळमधून आणखीन दूध काढता यावे, असा त्यांचा प्रयत्न आहे, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.