मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ ( ड्रोन सौजन्य - ऋतुराज बोडके ) कोल्हापूर :पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आज वाढ झाली असून राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी 40 फूट 8 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. या स्वयंचलित दरवाजामधून सुमारे आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे आज संध्याकाळी पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंचगंगा नदीच्या खोऱ्यात संततधार :सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. राधानगरी धरणाच्या पाच स्वयंचलित दरवाज्यातून 7 हजार 140 क्यूसेक तर पावर हाऊसमधून 1400 क्यूसेक असा 8 हजार 540 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. सध्या धरणाच्या पाण्याची पातळी 347.20 फूट तर पाणीसाठा 8304.08 दशलक्ष घनफूट आहे. राधानगरीत एकूण पाऊस 2 हजार 376 मिलिमीटर झाल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे.
अलमट्टीतून विसर्ग वाढवला :कर्नाटकातील अलमट्टी धरणातून गुरुवारी दुपारी चार वाजल्यापासून 1 लाख 75 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा, कोयना, कृष्णा, पंचगंगा या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढत आहे. यामुळेच कर्नाटक आणि महाराष्ट्र जलसंधारण प्रशासनाने आपापसात ताळमेळ ठेवत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी अलमट्टीतून विसर्ग सुरू केला आहे.
पूररेषेतील बांधकामे कळीचा मुद्दा :यापूर्वी 2019 आणि 2021 मध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला आलेल्या महापुराचे खापर अलमट्टी धरणाच्या फुगवट्यावर फोडले गेले. मात्र आता कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी, कुंभी, कासारी यासह अन्य धरणे भरलेली नाहीत. तरीही कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर शहरात पूररेषेत झालेली बांधकामे याला कारणीभूत आहेत. मात्र जाणीवपूर्वक या बांधकामाकडे दुर्लक्ष करून महापुराचे खापर अलमट्टी धरणाच्या फुगवट्यावर फोडले गेले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल ही कोल्हापूरकर विचारत आहेत.
पुढील 24 तास कोल्हापूरसाठी महत्वाचे :राधानगरी धरणातून विसर्ग सुरू होऊन 36 तास झाले आहेत. मात्र पंचगंगेच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील ज्या गावांना आणि घरांना पुराचा फटका बसतो, अशा कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतरित केले आहे. मात्र राधानगरी धरणातून होणारा विसर्ग पाहता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये समन्वय :अलमट्टी धरण व हिप्परगी धरणाच्या पाणीसाठ्यावर कृष्णा आणि पंचगंगेची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सिंचन विभागामध्ये समन्वय साधला जात आहे. 517.5 मीटर पर्यंत पाणीपातळी राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पुढे तसा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सध्या तरी कृष्णा नदीची पाणीपातळी कमी असल्याने अलमट्टी धरणात 87.35 इतका पाणीसाठा झाला आहे. जलाशयातील पाणी साठ्यात होणारी आवक वेगाने वाढत आहे. धरणात 1 लाख 16 हजार 263 आवक सध्या सुरू आहे. 123 टीएमसी इतकी क्षमता असणारे अलमट्टी धरण 71 टक्के भरले आहे. कोयना, कृष्णा आणि पंचगंगा नदी खोऱ्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. यामुळे अलमट्टी धरणातून आणखी विसर्ग वाढल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुरापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
कोल्हापूरकरांच्या मदतीला धावणार शिवाजी विद्यापीठ :धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले. यामधून पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपत्रात सुरू आहे. परिणामी पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. संभाव्य पूर्व परिस्थिती ओळखून शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. 2019 आणि 2021 च्या महापुरात शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूरकरांना मदतीचा हात दिला होता. यंदाही संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यापीठाकडून पिण्याच्या पाण्याची सोय तसेच वस्तीगृहात राहण्याचीही सोय केली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरकरांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सांगितले.
हेही वाचा -
- Kolhapur Rain Update: पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; धोका पातळीकडे वाटचाल, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश
- Panchganga River Floods : राधानगरी धरणाचे सात दराचे उघडले; पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर, सतेज पाटलांचे कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पत्र