कोल्हापूर : कोल्हापूरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून 15 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा पाणीपातळीत वाढ होत आहे. आत्तापर्यंत 47 बंधारे पाण्याखाली गेले असून असाच पाऊस सुरू राहिल्यास पंचगंगा नदी उद्या सकाळपर्यंत इशारा पातळी गाठेल (Panchganga river will cross the warning level) अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रकल्पांमधील पाणीसाठा -
धरण | सध्याचे पाणी | एकूण क्षमता |
राधानगरी धरण | 4.49 टीएमसी | 53.69 टक्के |
तुळशी | 1.81 टिएमसी | 52.12 टक्के |
वारणा | 18.19 टिएमसी | 52.89 टक्के |
दुधगंगा | 11.22 टिएमसी | 52.89 टक्के |
कासारी | 1.69 टिएमसी | 60.90 टक्के |
कडवी | 1.69 टिएमसी | 52.12 टक्के |
कुंभी प्रकल्प | 1.51 टिएमसी | 55.69 टक्के |
पाटगाव प्रकल्प | 2.00 टिएमसी | 53.71 टक्के |
चिकोत्रा प्रकल्प | 0.82 टिएमसी | 53.60 टक्के |
चित्री प्रकल्प | 0.87 टिएमसी | 46.33 टक्के |
जंगमहट्टी प्रकल्प | 0.67 टिएमसी | 55.13 टक्के |
घटप्रभा प्रकल्प | 1.56 टिएमसी | 100 टक्के |
जांभरे प्रकल्प | 0.82 टिएमसी | 100 टक्के |
कोदे प्रकल्प | 0.21 टिएमसी | 100 टक्के |
आंबेओहोळ | 0.81 टिएमसी | 100 टक्के |
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन - दोन आठवडे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी वर्षा सहलीला, ट्रेकिंगला जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. सद्यस्थितीत भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील धबधबे व अन्य वर्षा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. याच कालावधीत जिल्ह्यातील बऱ्याच संघटना पन्हाळा ते पावनखिंड -विशाळगड अशा मार्गावर जंगल सफर आणि ट्रेकिंगच्या मोहिमा आयोजित करत आहेत. अशा स्वरुपाच्या मोहिमा, ट्रेकिंग मध्ये सहभाग घेत असताना अतिवृष्टीमुळे या मार्गावर दरड कोसळणे किंवा पूरस्थिती निर्माण होणे अशा स्वरूपाच्या घटना घडू शकतात. यामुळे अतिवृष्टी कालावधीत अशा स्वरूपाच्या मोहिमा आयोजित करू नयेत आणि यामध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.