कोल्हापूर - लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले पर्यटक, विद्यार्थी, यात्रेकरू, प्रवासी, स्थलांतरित कामगारांसह अडकलेल्या इतर नागरिकांनी आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी महापालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतींशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या https://bit.ly/Kopentryexit या लिंकवर आपली माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
स्वतःच्या जिल्ह्यात परतण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर... लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरू, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत. अशा व्यक्तींना आपापल्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यामध्ये जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींसाठी यादी करण्याची प्रक्रिया महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतस्तरावर सुरू झाली आहे. अशा ठिकाणी त्यांनी संपर्क साधावा. याठिकाणी तयार झालेली यादी जिल्हा प्रशासनाकडे येईल. ही यादी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. त्यांच्याकडून परवानगी आल्यास अशा लोकांना त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात, राज्यात जाण्यास परवानगी देण्यात येईल, अशा व्यक्ती स्वत:च्या वाहनाने किंवा भाड्याच्या वाहनाने जावू शकतील.
आपल्याला कोल्हापूर मध्ये यायचे असेल तर -
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक इतर जिल्ह्यात किंव्हा राज्यात अडकले असतील अशांसाठी त्या-त्या जिल्ह्यात, राज्यात यादी तयार करण्याचे काम तेथील जिल्हाधिकारी करत आहेत. कोल्हापूर बाहेर अडकलेल्या लोकांची यादी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. मान्यता मिळाल्यानंतर अशा व्यक्तींना येण्यास परवानगी मिळणार आहे. या दोन्ही पद्धतीमध्ये त्या-त्या नागरिकांची त्या-त्या जिल्ह्यात वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे. आरोग्याच्यादृष्टीने सक्षम असल्यानंतरच त्यांना जाण्यास अनुमती देण्यात येणार आहे. शिवाय कोरोनाशी संबंधित काही लक्षणे असल्यास त्याच्यावर त्याच ठिकाणी उपचार करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
संपूर्ण प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने दिलेली लिंक -
https://bit.ly/Kopentryexit या लिंक वर जाऊन नागरिकांना माहिती भरावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अधिक माहितीसाठी 9356716563, 9356732728, 9356713330, 9356750039 आणि 9356716300 हे पाच व्हाट्सॲप क्रमांक सुद्धा संपर्कासाठी दिले आहेत. यावरही आपल्याला लिंक मिळेल. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि 0231-2659232, 2652950, 2652953-54 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.