कोल्हापूर : Illegal pregnancy diagnosis in Kolhapur : क्रांतिसिंह नाना पाटीलनगर म्हाडा कॉलनीतील एका घरात बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करून स्त्री-भ्रूणहत्या करणार्या टोळीचा मंगळवार (16 जानेवारी)रोजी पर्दाफाश करण्यात आला. मुलगा होण्यासाठी एक लाख रुपयांचं औषध देणार्या एका बोगस डॉक्टरसह तिघांचा यात समावेश आहे. स्वप्नील पाटील (रा. बालिंगा) हा बोगस डॉक्टर कारवाईवेळी पसार झाला आहे. गुन्हा दाखल करून पोलिसांनी अजित केरबा डोंगरे (रा. म्हाडा कॉलनी), कृष्णात आनंदा जासूद (रा. निगवे दुमाला) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
डमी गरोदर पोलीस महिला : जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने एका स्टींग ऑपरेशनद्वारे हे प्रकरण उघडकीस आणलं. आमचे औषध घेतले तर शंभर टक्के मुलगाच होणार अशी जाहिरात सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली होती. ही जाहिरात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पाहिली. त्यानंतर एका डमी गरोदर पोलीस महिला कर्मचार्याला पाठवून हे प्रकरण उघडकीस आणण्यात आलं.
औषधामुळं मुलगाच होईल : जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभाग, पोलीस आणि पीसीपीएनडीटी अॅक्टनुसार नेमलेल्या समितीला चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस मुख्यालयातील रुबीना पटेल या गर्भवती महिला कॉन्स्टेबलला डमी म्हणून तयार करण्यात आलं. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर या स्ट्रीँग ऑपरेशनमध्ये सहभागी झाल्या. क्रांतीसिंह नाना पाटीलनगर येथील एका घरामध्ये त्यांना बोलवण्यात आलं. तेथे स्वप्निल पाटील, कृष्णात जासूद, अजित डोंगरे होते. औषधासाठी एक लाख रुपये द्यावे लागतील, असं आरोपींनी सांगितलं. सात दिवस औषध घेतल्यानंतर औषधामुळं मुलगाच होईल. पण खात्री म्हणून औषध घेतल्यानंतर गर्भलिंंगनिदान चाचणी केली जाईल. चाचणीत मुलगी असल्याचं स्पष्ट झाल्यास गर्भपात केला जाईल. त्याचे स्वंतत्र पैसे द्यावे लागतील, असं सांगण्यात आलं.
यांचा कारवाईत सहभाग : खोलीमध्ये सोनोग्राफीसह सर्व यंत्रणा सज्ज होती. येथे गर्भलिंग निदान व गर्भपातही होत असल्याची खात्री होताच रुबिना पटेल, गीता हसूरकर यांनी पोलीस व आरोग्य पथकाला बोलावलं. ही पथके दाखल होताच कारवाई करण्यात आली. सोनोग्राफी मशिन, गर्भपाताचे कीट, रोख 20 हजार रुपये जप्त करण्यात आलं. सीपीआरच्या वैद्यकीय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, पीसीपीएनडीटी समितीच्या अॅड. गौरी पाटील, गीता हासूरकर यांनी हे स्टींग ऑपरेशन केले. करवीरचे सहायक पोलीस निरीक्षक युनूस इनामदार, प्रज्ञा पाटील, योगेश कांबळे, शहनाज कनवाडे, रुबीना पटेल, सचिन देसाई यांनी कारवाईत सहभाग घेतला.