कोल्हापूर : राजेंद्र नगरातील एका इमारतीत गेल्या काही दिवसापासून जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री अकरा वाजता पोलिसांनी या इमारतीवर छापा टाकला. अचानक पोलिसांना पाहून जुगार खेळणाऱ्यांची भांबेरी उडाली. पैसे आणि जुगाराचे साहित्य जागेवरच टाकून पळापळ सुरू झाली. पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये साहिल मिणेकर या तरुणाचे डोके गटारीच्या कटड्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली तर दत्तात्रय देवकुळे हा तरुणही जखमी झाला. साहिल याला प्रथम खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सीपीआरला नेण्याचा सल्ला मित्र आणि नातेवाईकांना दिला.
सीपीआरमध्ये तणाव :साहिल व दत्तात्रेय यांना तातडीने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच साहिल्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दत्तात्रय देवकुळे याला खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. यातील अन्य दोघे जखमींवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने साहिल मिणेकर याचा मृत्यू झाल्याचे समजताच राजेंद्र नगर परिसरातील साहिलच्या मित्र आणि नातेवाईकांनी सीपीआर परिसरात गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.