कोल्हापूर -जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. संपूर्ण यंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी सज्ज आहेच. शिवाय कोरोनाला मुळापासून नष्ट करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने कंबर कसलीय. यात गणपती बाप्पा कसे मागे राहतील? कोल्हापूरातील वैद्य कुटुंबातील 'बाप्पा' कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. शिवाय कोरोनावर मात करण्यासाठी जनजगृती करत आहेत. पाचगाव रोडवरील आनंद प्राईड येथे राहणाऱ्या प्रसाद वैद्य यांनी 'सलाम कोरोना योध्यांना' या थीमवर घरगुती देखाव्याची सजावट केली आहे. अहोरात्र राबणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचाऱ्यांचे आभार या देखाव्याच्या माध्यमातून मानले आहे.
बाप्पा करताहेत कोरोना रुग्णांची सेवा; देखाव्यातून वैद्य कुटुंबीयांनी मानले यंत्रणा, प्रशासनाचे आभार हे कोणते कोविड सेंटर नाही.... किंवा हॉस्पिटल नाही...ही आहे वैद्य कुटुंबाने साकारलेले गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी केलेली सुंदर सजावट. कोल्हापूरतील पाचगाव रोडवर आनंद प्राईड या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रसाद वैद्य, शर्मीली वैद्य या कुटुंबीयांनी कोल्हापूर महापालिकेने साकारलेल्या कोविड केयर सेंटरचा देखावा तयार केला आहे. प्रसाद, शर्मीली यांच्यासह मुले नेहरिका वैद्य, अर्णव वैद्य यांनी चार दिवसांपूर्वी तयारी सुरू केली. ब्लाउज पीस, फायबर, पिशवी, स्लीपिंग फम, तगड, बाहुल्या यांचा वापर करून हे कोविड सेंटर उभे केले आहे. जवळपास २१ बेड तयार केलेत. सेवा देणारे डॉक्टर, अहोरात्र गस्त घालत असलेले पोलीस, अंबुलन्स, नर्सेस, सफाई कर्मचारी यांची सध्या परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न वैद्य कुटुंबीयांनी केला आहे. शाहू युथ फाउंडेशनच्या माध्यमातून हा देखावा करण्याचे ठरवले. कोरोनाचे संकट बाप्पा दूर करेलच, पण मोठ्या संकटाचा देखील डॉक्टर, नर्सेस, पोलीस, जिल्हा प्रशासन आणि मुख्यमंत्री धाडसाने सामना करत आहेत. त्याचा मला अभिमान वाटतो, त्यांना आणखी प्रेरणा मिळावी, म्हणून हा देखावा केला असल्याचे प्रसाद वैद्य यांनी सांगितले. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. गोरगरीब जनता या संकटात अडचणीत आली आहे. 'बाप्पा' हे संकट नाहीसे कर, संकट कमी करून पुन्हा एकदा हे जग रस्त्यावर धावू दे,अशी प्रार्थना मी गणपती बाप्पाकडे करते, असे शर्मिली वैद्य म्हणाल्या.
मुख्यमंत्री, पालकमंत्री,जिल्हाधिकारी, आयुक्त यांचे विशेष आभार
त्याला काय होतंय, म्हणत कोल्हापूरकरांची बेफिकिरी वाढलेली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. यंत्रणेवर मोठा ताण पडलेला असून देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याची परिस्थिती कशी नियंत्रणात येईल? यासाठी प्रयत्न करत आहेत. तर जिल्हाधिकारी दौलत देसाई, पालकमंत्री सतेज पाटील, आयुक्त डॉ. मालिनाथ कलशेट्टी आणि जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख हे वारंवार जनतेला आवाहन करत आहे. त्याकडे काणाडोळा करून चालणार नाही. नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील या देखाव्याच्या माध्यमातून केले असल्याचे वैद्य यांनी सांगितले.