कोल्हापूर - मागील दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात 18 हजार आणि आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास 20 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोल्हापूरातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जवळपास 45 हजारांकडे वाटचाल करत आहे. असे असले तरी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरात नवीन रुग्णांची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी जवळपास 340 तर मंगळवारी 205 नविन रुग्णांची भर पडली.
कोल्हापूरात मृत्यूंची संख्या 1400 पार; प्रशासनासमोर मोठे आव्हान - कोल्हापूर कोरोना न्यूज
कोल्हापुरात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आजपर्यंत कोल्हापूरात १ हजार ४०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूंची संख्या मात्र वाढतच चालली आहे. मंगळवारी जिल्ह्यात एकूण 25 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूंची संख्या रोखण्यात कोल्हापूर प्रशासनासमोर अजूनही मोठे आव्हान बनले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सद्यस्थितीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात आजपर्यंत 43 हजार 982 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 33 हजार 297 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1 हजार 423 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9 हजार 262 इतकी झाली आहे.
प्रत्येक महिन्यात कसा वाढत गेला कोरोनाचा प्रादुर्भाव यावर एक नजर -
- एप्रिल, मे आणि जून तीन महिन्यात एकूण 848 रुग्णांना कोरोनाची लागण. त्यातील 723 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. या तीन महिन्यात रिकव्हरी रेट राज्यात पहिल्या स्थानावर म्हणजेच 94.59 टक्के इतका होता.
- जुलै महिन्यात एकूण 5 हजार 462 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 2 हजार 112 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रिकव्हरी रेट 38.67 टक्क्यांवर आला.
- ऑगस्ट महिन्यात एकूण 17 हजार 778 इतक्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची वाढ, त्यातील 12 हजार 214 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रिकव्हरी रेट काही प्रमाणात वाढून 68.70 टक्के इतका झाला.
- सप्टेंबर महिन्यात एकूण 19 हजार 975 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 17 हजार 700 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रिकव्हरी रेट 76 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे.