कोल्हापूर : व्हॉट्सअप स्टेटसवरून झालेले आंदोलन आता थेट इंटरनेट बंदपर्यंत पोहोचले आहेत. आक्रमक झालेल्या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा राज्याच्या गृहमंत्रालयांनी सूचना दिल्या आहेत. चुकीचे वागणाऱ्यावर कारवाई करा व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.
कायदा व्यवस्था सुव्यस्थित राखण्याचा प्रयत्न :आज हिंदुत्ववाद्यांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जमण्यास प्रशासनाने बंदी केली आहे. जमाव जमवणे, मोर्चे काढणे, सभा घेणे याला प्रशासनाने बंदी घातली आहे. अप्पर जिल्हाधिकारी भगवानराव कांबळे यांनी बंदीचे आदेश काढले आहेत. हा बंद मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने हिंदुत्तवादी संघटनांना केले होते. परंतु ते बंदवर ठाम राहिले आहेत. पोलिसांकडून कायदा व्यवस्था सुव्यस्थित राखण्याचा प्रयत्न होत आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात : दरम्यान आज सकाळपासून शहरातील व्हिनस काॅर्नर परिसरासह अन्य ठिकाणी शुकशुकाट आहे. बस, रिक्षा सुरु आहेत. आज दहा वाजता शिवाजी चाैक परिसरात हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत बंदचे आवाहन केले आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरातील वातावरण तणावपूर्ण बनले. आज सकाळी दहा वाजल्यापासून सर्व व्यवहार, शहरातील प्रमुख व्यापार, दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. बंद कालावधीत कोणताही अनुचित प्रकार करू नये, यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न :अहमदनगर शहरातील फकीरवाडा भागात दर्गाच्या उरूसमध्ये मुकुंदनगर भागात काही युवक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशिष्ट समाजातील युवकांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप यावेळी करण्यात आला. हिंदू समाजावर होणारे अत्याचार आणि लव्ह जिहाद विरोधात 6 जून रोजी संगमनेर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भगव्या मोर्चा काढण्याच आला होता.