कोल्हापूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता करवीर निवासनी अंबाबाईच्या दर्शनाची वेळ कमी करण्यात आली आहे. सकाळी 7 ते रात्री 9 असे 14 तास अंबाबाईचे दर्शन घेता येत होते. मात्र, आता यामध्ये 4 तास दर्शनाची वेळ कमी करण्यात आली आहे. शिवाय मंदिरातील अभिषेकसुद्धा काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कडक नियमावली बनविण्यात आली आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.
लॉकडाऊननंतर राज्यातील सर्वच मंदिरे उघडण्यात आली. सुरुवातील केवळ 6 ते 7 तास दर्शन घेता येत होते. जसजसा कोरोनाचा प्रसार कमी झाला, तसतशी दर्शनाची वेळ वाढविण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अंबाबाईच्या दर्शनासाठी वेळ कमी करण्यात आली आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेमध्येच अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, मुखदर्शनाच्या रांगेत आता सोशल डिस्टन्सचे बॉक्ससुद्धा आखले जाणार असून भाविकांना त्यामध्ये उभे राहतच रांगेतून यावे लागणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले आहे.
मास्कचा वापर आवश्यक अन्यथा दंडात्मक कारवाई