कोल्हापूर- उद्यापासून (सोमवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नियमावली बनवली असून विविध अटी-शर्ती भाविकांना घातल्या आहेत. मंदिर जरी दर्शनासाठी उघडणार असले तरी कोरोनाचे संकट मात्र अद्यापही संपूर्ण देशावर आहे आणि त्यामुळेच भक्तांनी सुद्धा या नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे. नेमक्या काय नियमावली आहेत आणि कशा पद्धतीने भाविकांना अंबाबाईचे दर्शन मिळणार आहे. याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली.
कासव चौकातूनच अंबाबाईचे दर्शन -
उद्यापासून अंबाबाई मंदिरात भक्तांना प्रवेश मिळणार असला तरी मंदिरातील कासव चौकातूनच भक्तांना देवीचे दर्शन मिळणार आहे. त्यामुळे मूर्तीच्या जवळ जाऊन दर्शन घेता येणार नाही. मात्र, काही दिवसांनी भक्तांना आणखी जवळ जाऊन दर्शन घेता येणार आहे.
मोफत ऑनलाईन बुकिंगची सुद्धा पुढच्या 4 दिवसात सुविधा -
गेल्या 7 महिन्यांपासून अंबाबाई मंदिरात भक्तांना दर्शन घेता आले नाही. त्यामुळे भक्त मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच भक्तांना दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे. हे बुकिंग विनामूल्य असणार आहे. त्यामुळे जेणे करून भक्तांची गैरसोय होणार नाही.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना प्रवेश नाही -
कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. याचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना सुद्धा याचा धोका आहे. त्यामुळे त्यांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
देवस्थान समितीच्या 3 हजार 42 मंदिरात सुद्धा नेटके नियोजन
पश्चिम महाराष्ट्र्र देवस्थान समितीच्या कार्यक्षेत्रात एकूण 3 हजार 42 मंदिरे आहेत. त्यामध्ये सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे येतात. यामध्ये अंबाबाई मंदिरांबरोबरच जोतिबा मंदिर आणि इतर काही महत्त्वाची मंदिरे सुद्धा येतात. त्याठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने नियम बनविण्यात आले असून भाविकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.