कोल्हापूर - प्रथम कंत्राटी पध्दतीवर व त्यानंतर कायमस्वरुपी कामावर आदेश काढून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील वाहनचालक राहूल प्रल्हाद बट्टेवार याला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विंधन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हुपरी येथील तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखानेलाही एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दोन आरोपींना रंगेहात पकडल्याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीपीआरमध्ये रुग्ण सहाय्यकांची (वॉर्ड बॉय) प्रथम कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती होणार आहे. काही दिवसानंतर त्यांना कायमस्वरुपी कामावर हजर करुन घेणार असल्याचे संशयित आरोपी बट्टेवार याने तक्रारदाराला सांगितले होते. भावाला व त्याला स्वत:ला वॉर्डबॉय म्हणून कामावर हजर करुन घेण्याची विनंती तक्रारदाराने संशयित आरोपीकडे केली. बट्टेवार याने तक्रारदार आणि त्याच्या भावाला वॉर्ड बॉय म्हणून कंत्राटी पध्दतीने कामावर हजर करुन घेण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी रितसर अर्ज स्वत: भरतो असे सांगून दोघांच्या आधारकार्डची झेरॉक्स व छायाचित्रे घेवून येण्यास सांगितले. वरिष्ठांना सांगून कायमस्वरुपी पुन्हा कामावर घेण्याचा आदेश मुंबई येथील आरोग्य विभागामधून काढून देण्यासाठी 5 लाख रुपये द्यावे लागतील, असेही आरोपीने सांगितले. अन्यथा, कायमस्वरुपी नोकरीचा आदेश देणार नाही, असे बट्टेवार याने तक्रारदाराला सांगितले.