कोल्हापूर - सात वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापुरातील कागल तालुक्यातील सावर्डे गावामध्ये ही घटना घडली असून हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय गावकऱ्यांसह नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. वरद रवींद्र पाटील (वय 7, रा. सोनाळी, ता. कागल) असे मृत मुलाचे नाव आहे.
संशयीत आरोपीने दिली माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी वरद रवींद्र पाटील हा कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथे आपल्या आजोळी वास्तुशांतीसाठी आजोबा दत्तात्रेय शंकर म्हातुगडे यांच्याकडे गेला होता. त्याच्यासोबत मुलाचे वडील रवींद्र पाटील आणि आई पूनम पाटील सुद्धा गेल्या होत्या. घरगुती संबंध असल्याने यावेळी संशयित आरोपी सुद्धा वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी सावर्डे बुद्रुक येथे आला होता. दरम्यान, रात्री जेवण झाल्यानंतर संशयित आरोपींने वरद पाटील याला घेऊन गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी दुसऱ्या दिवशी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने याबाबत काही माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. आज पुन्हा त्याच्याकडे कसून चौकशी केली असता संबंधित संशयित आरोपीने सावर्डे गावानजीक असलेल्या तलावानजीक मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
गावकऱ्यांसह नातेवाईकांना नरबळीचा संशय
संशयित आरोपीचे पंधरा वर्षांपूर्वी लग्न झाले आहे, मात्र अद्याप त्याला आपत्य नाही. मृत वरद रवींद्र पाटील याच्या घरच्यांचे सुद्धा संशयित आरोपीशी कोणतेही वैर नाही. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा, अशी शक्यता ग्रामस्थांसह नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. संशयित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीसुद्धा नातेवाईकांनी केली आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. प्राथमिक माहितीनुसार, नाक आणि तोंड दाबून खून केल्याची माहिती समोर येत असून सध्या वरद पाटीलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे आणला आहे. पोलीस अधिक तपास करत असून त्यानंतरच हा नेमका काय प्रकार आहे, हे समोर येणार आहे.