कोल्हापूर - दरवर्षी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो. यावेळी देवीचा साजशृंगार हा अत्यंत देखणा आणि लोभस असतो. तिच्या या शृंगारामध्ये मौल्यवान दागिने अधिक भर घालतात. याच मौल्यवान दागिन्यांची 300 वर्षांपासून देखभाल करण्याची जबाबदारी कोल्हापुरातल्या एका कुटुंबावर आहे. कोण आहेत जे या मौल्यवान खजिन्याची काळजी घेत असतात, कशा प्रकारे त्यांचा एकूणच दिनक्रम असतो आणि या खजिन्यात अंबाबाईचे कोणकोणते मौल्यवान दागिने आहेत, यावरचा हा खास रिपोर्ट.
दरवर्षी नवरात्रोत्सव जवळ आल्यानंतर आंबाबईच्या सर्वच सोन्या-चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाते आणि याचवेळी देवीचे सर्व दागिने पाहायला मिळतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून देवीचे हे मौल्यवान दागिने सांभाळण्याची जबाबदारी कोल्हापुरातल्या खांडेकर कुटुंबावर आहे. 2013 पासून या दागिन्यांचे खजिनदार (हवालदार) म्हणून काळजी घेण्याची जबाबदारी महेश खांडेकर यांच्याकडे आहे. महेश खांडेकर यांच्याकडे त्यांचे वडील महादेव खांडेकर यांच्याकडून ही जबाबदारी आली. गेल्या 300 वर्षांपासून पिढ्यानपिढ्या या कुटुंबावर खजिनदार म्हणून जबाबदारी आहे. इंद्रोजी खांडेकर यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली असून त्यांच्या 11 व्या पिढीकडे म्हणजेच महेश खांडेकर यांच्याकडे आजही दागिन्यांची जबाबदारी आहे. त्यांनीही ही परंपरा कायम ठेवली असून आता त्यांना यासाठी मानधनसुद्धा मिळते.