कोल्हापूर -बेळगाव आणि सीमाभागातमहाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. कन्नड संघटनांचा बेळगावमध्ये धिंगाणा सुरू असून कन्नड रक्षण वेदिका संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा, इशाराही कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त विधान कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते.
मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. यानंतर एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा केली आहे. यामुळे सीमाभागात याचे संतप्त पडसाद उमटले असून या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे.