कोल्हापूर -आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयएसओ मानांकन मिळाल्यामुळे कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू कारखान्याच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारखान्याला TUV Rheinland यांच्याकडून आयएससो 14001:2015 आणि आयएसओ 45001:2018 आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकने मिळाली आहेत. अशी मानांकने मिळवणारा छत्रपती शाहू साखर कारखाना देशातील पहिला साखर कारखाना ठरला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आजपर्यंत कारखान्याला 62 राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बक्षिसे
यावेळी घाटगे म्हणाले, श्री छत्रपती शाहू सहकारी कारखाना आजपर्यंत अखेर राज्य व राष्ट्रीय पातळीवरची 62 बक्षिसे मिळाली आहेत. कसेबसे 40 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणारा कारखाना आता 10 लाख 17 हजार मेट्रिक टन असा उच्चांकी गाळप आणि 12 लाख 3 हजार साखर पोत्यांचे संकी उत्पादन घेतला आहे. यामध्ये आता कारखान्याला TUV Rheinland (टीयूव्ही राईनलँड) यांच्याकडून आयएससो मानांकने मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शाहू सहकारी साखर कारखान्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शाहू साखरेचा एक वेगळा ब्रँड निर्माण झाला आहे, असे म्हणत याचे सर्व श्रेय सभासद शेतकऱ्यांसह सर्व हितचिंतकांना जाते, असे गौरवोद्गार घाटगे यांनी यावेळी काढले.