कोल्हापूर - शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापूर शहरातील काही तरुणांनी व्हाट्सअपला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते. यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. बुधवारी कोल्हापूर बंद ठेवून हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकाराचा निषेध केला. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाने कोल्हापूर शहरातील काही ठिकाणी दगडफेक केली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये आणि सोशल मीडियावर अफवा पसरून तणाव निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील इंटरनेटसेवा बंद करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता. गुरुवारी कोल्हापूर शहरातील परिस्थिती पूर्वरत झाली होती. मात्र इंटरनेट सेवा बंद असल्याने बँकांच्या व्यवहारांसह इतर अनेक कामे खोळंबल्याने सर्वसामान्य नागरिकांची वाताहात झाली. अखेर आज इंटरनेट सेवा सुरू झाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अंबाबाई दर्शनासाठी गर्दी - बुधवारी झालेल्या दंगलीनंतर कोल्हापुरात दोन दिवस तणावाचे वातावरण होते. करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या नागरिकांच्या घट झाली होती. मात्र आज सर्व सेवा सुरळीत झाल्याने अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यार्थी आणि पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरू होती. याच दरम्यान कोल्हापुरात धार्मिक तेढ निर्माण झाल्याने प्रवेश प्रक्रियेला काहीसा विलंब झाला होता. आता कोल्हापुरातील सामाजिक वातावरण निर्मळ झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू- शहर आणि जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरळीत सुरू झाली आहे. एसटी आणि केएमटी बसेस पूर्ण क्षमतेने प्रवाशांची ने आण करत आहेत. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी अनेक ठिकाणी बसेस सोडण्यात आल्या असून ग्रामीण भागातून शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींचीही यामुळे सोय झाली आहे.