कोल्हापूर- जेष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या चौकशीत प्रगतीचा अभाव असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लगेचच गृह मंत्रालयाने या संशयितांची माहिती देणाऱ्यांसाठीच्या बक्षिसामध्ये ४० लाखांची वाढ केली. संशयितांची माहिती देणाऱ्यांना आता १० लाखांवरुन आता ५० लाख बक्षीस रक्कम करण्यात आली आहे.
पोलिसांकडून आजपर्यंत एकूण आठ जणांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र तपास पथकाला चकवा देत संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार अद्यापही फरार आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी तापास अधिकाऱ्यांवर तारेशे ओढले होते. त्यानंतर सरकारने विशेष तपास पथकामधील अधिकाऱ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ केली. एसआयटीमध्ये आता ७ ऐवजी १७ अधिकारी असणार आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी डॉ. विरेंद्र तावडे आणि गायकवाडच्या चौकशीतून सारंग अकोलकर, विनय पवार यांच्यासह अन्य चार संशयितांची नावे निष्पन्न झाली होती. त्यानुसार एसआयटीने अमोल काळेला १५ नोव्हेंबर २०१८, वासुदेव सुर्यवंशीला १ डिसेंबर २०१८, भरत कुरणेला १ डिसेंबर २०१८, अमित देगवेकरला १५ जानेवारी २०१९ मध्ये अटक केली होती. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसाठी मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडे यांनी अमोल काळेसह चारही मारेकऱ्यांवर वेगवेगळी कामगिरी सोपवली होती. बाँबस्फोट घडविण्यासह अग्नीशस्त्र चालविण्याच्या प्रशिक्षणाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. तर देगवेकरवर कॉम्रेड पानसरे यांचे निवासस्थान, बिंदूचौकातील कार्यालयाच्या रेकीची जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही निष्पन्न झाल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात स्पष्ट केले होते.
या चौघांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सध्या दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची संख्या सध्या आठवर गेली आहे. मात्र सर्व तपास अधिकाऱ्यांना चकवा देत संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार अजूनही फरार आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांसाठी १० लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले होते, ते आता ५० लाख करण्यात आले आहे.