कोल्हापूर -अनेक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना पाहायला मिळतात. यामध्ये वाहन चालविण्याचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढू लागले आहे. प्रत्येक वर्षीच्या तुलनेत दरवर्षी महिलांची संख्या वाढतच चालली आहे. दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना काढणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. मात्र यामध्ये आता महिलांचे प्रमाण तब्बल 20 ते 25 टक्के असल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे.
विशेष : महिलांच्या हाती स्टेअरिंग.. वाहन परवाना काढणाऱ्या महिलांच्या प्रमाणात वाढ
अनेक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना पाहायला मिळतात. यामध्ये वाहन चालविण्याचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढू लागले आहे. प्रत्येक वर्षीच्या तुलनेत दरवर्षी महिलांची संख्या वाढतच चालली आहे
वाहन चालवण्याचा परवाना काढणाऱ्या महिलांच्या प्रमाणात वाढ
इतकेच नाही तर, अवजड वाहन चालविण्यासाठी सुद्धा आता महिला समोर येत असल्याने ही कोल्हापूरच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. स्वतः प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीवन अल्वारिस यांनी सुद्धा या गोष्टीचे कौतुक केले आहे. शिवाय अनेक वर्षांच्या तुलनेत आता अधिक महिला लायसेन्स साठी समोर येत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक अनुज्ञाप्ती म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स काढत असतात. यामध्ये गेल्या वर्षी तब्बल 1 लाख 47 हजार लोकांनी दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहन चालविण्याचे परवाने काढले. यामध्ये 90 हजारांहून अधिक पुरुषांचा समावेश आहे तर 28 हजारांहून अधिक महिलांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये एक ते दीड टक्के महिलांनी अवजड वाहनांसाठी लायसन्स काढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे महिला दुचाकी चारचाकी वाहनांबरोबरच आता अजवड वाहन चालवण्याकडे सुद्धा वळताना पाहायला मिळत आहे. नक्कीच ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीवन अल्वारिस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे.
मोटार वाहन निरीक्षक पदांच्या परिक्षेवेळी सुद्धा अनेक महिला अवजड वाहनांचे लायसन्स काढतात -
मोटर वाहन निरीक्षक तसेच मोटर वाहन उपनिरीक्षक या पदांच्या भरतीसाठी जेव्हा परीक्षा घेतली जाते त्यापूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला अवजड वाहनांचे लायसन्स काढत असतात. त्या परीक्षेसाठी अवजड वाहनांचे लायसन्स अनिवार्य असते त्यामुळे अनेकजण लायसन्स काढत असतात अशी माहिती सुद्धा यावेळी स्टीवन अल्वारिस यांनी दिली.