कोल्हापूर- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासह साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या तसेच टाकाळा परिसरात राहणाऱ्या साडूच्या घरीदेखील छापा टाकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्या गाडीची सुद्धा यावेळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मुश्रीफांच्या गाडीची सुद्धा झडती - कोल्हापूर
चौकशी आणि छापेमारी दरम्यान, मुश्रीफ यांच्या गाडीचीसुद्धा प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली.
गाडीतील सुटकेसमध्ये असलेल्या कागदपत्रांची तपासणी यावेळी अधिकाऱ्यांनी केली. पण, यामध्ये काहीही आक्षेपार्ह सापडले नसल्याची माहिती मिळत आहे. सात गाड्यांमधून आलेल्या या सर्व अधिकाऱ्यांकडून संताजी घोरपडे या साखर कारखान्यावर सुद्धा छापा टाकण्यात आला. सकाळी 8 वाजल्या पासून सुरू असलेल्या या छाप्यामध्ये नेमकी कोणती चौकशी सुरू आहे, हे अद्याप समजू शकले नसले तरी सकाळपासून आमदार हसन मुश्रीफसुद्धा या अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या निवासस्थानी आहेत. शिवाय त्यांच्या एकाही कार्यकर्त्याला आत येऊ दिले गेलेले नाही. मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकल्याच्या माहितीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.