कोल्हापूर -गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा, कासारी कुंभी नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कोल्हापूरातील राजाराम बंधारा यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाऱ्यासह सध्या एकूण 9 बंधारे पाण्याखाली गेले आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; राजाराम बंधाऱ्यासह 9 बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली
काही दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भोगावती, पंचगंगा, कासारी कुंभी नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कोल्हापुरातील राजाराम बंधारा यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाऱ्यासह सध्या एकूण 9 बंधारे पाण्याखाली गेले आहे.
पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांमध्ये शिंगणापूर, इचलकरंजी, रुई या बंधाऱ्यांचाही समावेश आहे. राधानगरी धरणासह इतर सहा प्रकल्पांमधून 4 हजार 694 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात सुरू असून चंदगड, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे.
यावर्षी मान्सूनचे आगमन होताच कोल्हापूरात दोन ते तीन दिवस पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यावेळीही 17 बंधारे पाण्याखाली गेले होते. सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा मागच्या वर्षीसारखा महापुराचा धोका निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.