कोल्हापूर- महानगरपालिकेमध्ये महापौरपदाची जी खांडोळी केली जात आहे, ती कोल्हापूरच्या विकासासाठी न शोभणारी आहे. गेल्या चार वर्षांत कोल्हापूर महानगरपालिकेत सहा महापौर झाले. आज पुन्हा महापौर पदाची निवड पार पडणार आहे. या पंचवार्षिकमधील सातवा व्यक्ती महापौर पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे. नगरसेवकांचा पदासाठी असणारा हट्ट आणि नेतेमंडळींसमोर या नगरसेवकांना नाराज न करण्याचे आव्हानच असल्याचे जणू कोल्हापूर महानगरपालिकेत पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर शहरात अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. पण, एक महापौर आपल्या पदावर विराजमान होतो तोपर्यंत चार-पाच महिन्यांनी दुसऱ्या महापौरांची त्या पदावर निवड होते. त्यामुळे महापौर पदालाच आता कोल्हापूरमध्ये महत्व कमी झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे संपूर्ण कोल्हापूरकरांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे मत राजकीय अभ्यासकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.
महापौर-उपमहापौर पदासाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये ही निवडणूक पार पडणार असून महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर आणि भाजपच्या भाग्यश्री शेटके यांच्यात महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी संजय मोहिते आणि ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे यांच्यात ही लढत होत आहे. यामध्ये आघाडीच्या सूरमंजिरी लाटकर आणि संजय मोहिते यांची अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर, अशी निवड होईल असे निश्चित मानले जात आहे.