कोल्हापूर- यंदाची १९वी ऊस परिषद कोणत्याही परिस्थितीत घेणारच असून, ऊस परिषदेत दराचा निर्णय झाल्याशिवाय साखर कारखानदारांनी धुराडे पेटवू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. ऊस परिषदेची तारीख अद्याप ठरलेली नसून परिषदेची तारीख नंतर जाहीर करू, असेही शेट्टी म्हाणाले.
चालू वर्षीच्या उस गळीत हंगामाचा बिगूल वाजू लागला आहे. या पार्श्वभूमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. येत्या आठवड्याभरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी गावोगावी सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन ऊस परिषदेची तयारी करावी. तसेच, गाव बैठकीमध्ये, साखर कारखान्याकडून तीन टप्यात एफ. आर. पी. देण्याबाबत शेतकऱ्यांवर दबाव टाकून सह्या घेतल्या असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक रक्कमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.