महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर : ३ दिवसांत २४ हजार भक्तांनी घेतले अंबाबाईचे दर्शन - Ambabai temple devotees news

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. कोल्हापूरचे अंबाबाई मंदीर देखील दर्शनासाठी खुले झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात अंदाजे 3 ते 4 हजार भाविकांना दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात मंदिरात त्याहून अधिक म्हणजेच, 7 ते 9 हजार भाविक सुरक्षित दर्शन घेऊ शकत आहेत.

Ambabai Temple Kolhapur
अंबाबाई

By

Published : Nov 18, 2020, 7:32 PM IST

कोल्हापूर - दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. कोल्हापूरचे अंबाबाई मंदीर देखील दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. आज अंबाबाई मंदिर उघडून तीन दिवस झाले आहेत. या तीन दिवसांत जवळपास 24 हजार भक्तांनी देवीचे दर्शन घेतले आहे.

माहिती देताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य राजेंद्र जाधव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात अंदाजे 3 ते 4 हजार भाविकांना दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात मंदिरात त्याहून अधिक म्हणजेच, 7 ते 9 हजार भाविक सुरक्षित दर्शन घेऊ शकत आहेत. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे 4 वाजल्यापासून मंदिराबाहेर दर्शनासाठी रांग लागली होती. तीच परिस्थिती आजही पाहायला मिळाली. प्रत्येक भाविकाला दर्शन मिळावे यासाठी खूपच चांगल्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नियोजन केले आहे. सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत भक्तांना दर्शन मिळणार आहे. त्यामुळे, मधल्या काळातसुद्धा संपूर्ण मंदिर सॅनिटायझ करून घेतले जात आहे.

भक्तांकडून सुद्धा नियमांचे काटेकोरपणे पालन -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळाला असला तरी विविध नियम बनवण्यात आले आहेत. येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. शिवाय, एका वेळी २५ भक्तांना मंदिरात सोडले जात आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे, भक्तसुद्धा सर्वच नियमांचे पालन करून देवस्थान समितीला सहकार्य करत आहेत. विशेष म्हणजे, मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिर परिसरात भक्त फिरत बसू नयेत, यासाठीसुद्धा मंदिर प्रशासनाने कडक नियमावली बनवली असून, दर्शन मार्ग बनवण्यात आला आहे. पूर्व दरवाजातून प्रवेश करून दक्षिण दरवाजातून बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे, भक्तांना इतरत्र फिरणे अशक्य झाले आहे.

गर्दीमुळे मंदिर बंद करण्याची वेळ नाहीच -

तब्बल 8 महिन्यानंतर मंदिरे दर्शनासाठी उघडल्याने सर्वच धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी मंदिर बंद कराव्या लागल्याच्या घटना घडल्या. मात्र, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराबाहेर भक्तांनी गर्दी केली होती. तरीही प्रशासनाच्या नेटक्या नियोजनामुळे मंदिर बंद करावे लागल्याचा प्रसंग या ठिकाणी आला नाही. दररोज 3 ते 4 हजार भाविकांना दर्शन देण्याबाबत निर्णय झाला होता. मात्र, भाविकांच्या गर्दीचा विचार करून देवस्थान समितीने 8 हजारापेक्षा जास्त भाविकांना दर्शन मिळेल, असे नियोजन केले आहे.

हेही वाचा -कोल्हापूर: कोरोना बाधितांचे झाले कमी प्रमाण; बाधितांची एकूण संख्या ६००

ABOUT THE AUTHOR

...view details