महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर शहरात कडक लॉकडाऊन करा : महापौर आजरेकरांची मागणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी महापौर आजरेकरांची बैठक बोलावली होती.

kolhapur corona update
कोल्हापूर शहरात कडक लॉकडाऊन करा : महापौर आजरेकरांची मागणी

By

Published : Jul 16, 2020, 12:17 PM IST

कोल्हापूर - शहरामध्ये संध्याकाळी 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करा, अशी मागणी महापौर निलोफर आजरेकर यांनी महापालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त आयोजित बैठकीत केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी (14 जुलै) महापौरांंनी पदाधिकारी, पोलिस प्रशासन व अधिकारी यांची संयुक्त बैठक स्थायी समिती सभागृहात आयोजित केली होती. त्यावेळी ही मागणी केली.

महापौर निलोफर आजरेकर यांनी केलेल्या सूचना-

शहरातील रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करा. तसेच हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांवर अधिक लक्ष द्या. शहरामध्ये सुरू असलेल्या चहा आणि नाष्टा गाड्यांवर पार्सल ऐवजी जागेवरच खाण्यासाठी पदार्थ दिले जातात. त्याठिकाणी गर्दी होते. त्यामुळे विक्रेत्यांवर दंडात्मक करवाई करा. नियमाप्रमाणे दुचाकीवर एकच व्यक्ती व फोर व्हिलरमध्ये दोन व्यक्ति प्रवास करतील याची दक्षता घ्या. या नियमांचे उल्लंघन होत असल्यास पोलिस प्रशासनाने कडक करवाई करावी.

समारंभासाठी व अंत्यविधीसाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे अंमल करा. यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त टीम करा. कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी दोन कोरोनायोद्धे नेमण्यात यावेच. नागरिकांबरोबरच व्यावसायिकांनी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेचे बंधन पाळून आपले व्यवहार करा. या वेळेनंतर पोलीस प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक करवाई करावी असेही महापौर म्हणाल्या.

जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक पी.व्ही. जाधव यांनी सांगितले की, कडक नियमांचे पालन करण्यासाठी महापालिकेच्या मदतीला पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देऊ. तसेच सायंकाळी 7 नंतर नियमाप्रमाणे बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करू. यात्रांसाठी नदीवर गर्दी टाळण्यासाठी रात्रीची गस्त वाढवू असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उप महापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, सहा.आयुक्त चेतन कोंडे, अवधुत कुंभार, राजारामपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन.टी घोगरे, शाहूपूरी पोलीस निरीक्षक एस. एल. कटकधोंड, लक्ष्मीपूरीचे पोलीस निरीक्षक ए. व्ही. गुजर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, अतिक्रमण प्रमुख पंडीत पोवार, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details