कोल्हापूर- लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यास जिल्ह्यातील आमचे राजकारण संपणार असल्याची भीती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली. ते गुरुवारी खुपिरे येथे कार्यकर्त्यांशी बोलत होते. चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे.
लोकसभेला पराभव झाल्यास आमचे राजकारण संपेल, महादेवराव महाडिक यांना भीती - खासदार
लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यास जिल्ह्यातील आमचे राजकारण संपणार असल्याची भीती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी लोकसभेत पुतण्याचा पराभव झाला तर कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ) सत्ताही जाईल, असेही भाकीत केले आहे. गोकुळच्या विशेष सभेत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पोलिसांचे कडे तोडून मुख्य सभामंडपात धडक दिली होती. त्याचाही राग महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रदीप ज्या पद्धतीने सभेला नाचत आला तसाच त्याचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही महाडिक यांनी दिला आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात आमदार नरके यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचारात जोरदार पुढाकार घेतल्यानेही महाडिक यांना संताप अनावर झाला आहे.