कोल्हापूर- हजारोंच्या जनसागराच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी जवान जोतिबा गणपती चौगुले यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. उंबरवाडीमधील खुल्या पटांगणात शासकीय इतमामात हुतात्मा चौगुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जोतिबा चौगुले यांच्या वर्गमित्रांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ज्या मैदानात आम्ही सर्व लहान असताना एकत्र खेळायचो त्याच मैदानात मित्राचे अंत्यसंस्कार झाले, हे आमच्यासाठी खूपच धक्कादायक असल्याचे सांगत आपल्या लाडक्या मित्राला त्यांनी अखेरचा निरोप दिला.
हेही वाचा -'जोतिबा चौगुले अमर रहे'.... म्हणत हुतात्मा जवानाच्या पत्नीने फोडला हंबरडा
जम्मू-काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जोतिबा चौगुले यांना वीरमरण आले होते.
'ज्या मैदानात एकत्र खेळलो त्या मैदानातच जोतिबाचा अंत्यसंस्कार'
ज्या मैदानात आम्ही लहानपणी एकत्र खेळलो त्याच मैदानात त्याचा अंत्यविधी होत अशसल्याचे पाहून आम्हाला जो त्रास होतोय तो शब्दात सांगू शकत नसल्याचे जोतिबा यांच्या मित्रांनी सांगितले. मात्र, आपल्या भारतमातेसाठी त्याने आपले बलिदान दिले आहे. त्याचा आम्हा सर्वच मित्रांना अभिमान असल्याचेही त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
'माझ्या शहीद जवानांच्या पुस्तकात आता मित्राचा सुद्धा लेख लिहावा लागतोय याचं मोठं दुःख'
शिक्षक झालेल्या महेश उगरे या मित्रानेसुद्धा जवान जोतिबा चौगुले यांच्यासोबतचे काही किस्से सांगितले. आजपर्यंत 30 वीरमरण आलेल्या जवानांवर लेखन केलं आहे. काही दिवसातच प्रकाशनाचा कार्यक्रम होणार होता. पण, आता वर्गमित्रच हुतात्मा झाला आणि यामध्ये तो 31 वा असेल याची कल्पनाही केली नसल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.