कोल्हापूर - वारंवार दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा निर्घृण खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील हुपरी येथे ही घटना घडली आहे. समिना इम्तियाज नदाफ (वय 28) असे मृत पत्नीचे नाव असून इम्तियाज राजू नदाफ (वय 32) असे पतीचे नाव आहे. पोलिसांनी निर्दयी पतीला अटक केली आहे.
सत्तूराने वार करून पत्नीची निर्दयी हत्या व्यसनाधीन पती -
समिना इम्तियाज नदाफ आणि इम्तियाज राजू नदाफ या दोघांचा विवाह झाला आहे. पती पत्नीमध्ये वारंवार वादावादी होत होती. व्यसनाधीन आणि कर्जबाजारी असल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत असल्याने समिना आपल्या वडिलांकडे मुलांसह राहायला आली होती. पती इम्तियाज करोची येथे आपल्या घरी येण्यासाठी समिना यांना विनंती करत होता. मात्र सतत दारूच्या नशेत वादावादी करत असल्याने त्यांनी जाण्यास नकार दिला. काल सुद्धा याबाबत त्यांच्यात वादावादी झाली. दिवसभर सर्वांना फोन केले पण प्रतिसाद दिला नसल्याने तो शेवटी हुपरी येथे आला. पत्नी समिना आपल्या वडिलांसोबत त्यांच्या गाड्यावर काम करत होती. त्याने येथीलच सत्तूर घेऊन समिनावर वार केले. तसेच भीतीने तिथून पळून जात असताना तिने इथल्याच एका इस्त्री दुकानात आसरा घेतला. मात्र त्या दुकानात जाऊन त्याने तिच्या मानेवर तसेच खांद्यावर सत्तूराने सपासप वार केले. या झटापटीवेळी सासऱ्यांना सुद्धा दुखापत झाली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाठलाग करून आरोपीला अटक -
दरम्यान, अनेकांनी त्या निर्दयी पतीला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्तबंबाळ अवस्थेत असलेली त्याची पत्नी आणि हातातील सत्तूर पाहून कोणी पुढे गेले नाही. शेवटी त्याने इथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि पळून जाणाऱ्या पतीला पाठलाग करून अटक केली.