कोल्हापूर -शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीने महापालिकेतील घरफाळा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करावी, घरफाळा घोटाळ्यासंदर्भात तत्काळ श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी केली. यासाठी त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर लेझीम, लाठीकाठी आणि मर्दानी खेळ खेळून अभिनव आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
घरफाळा घोटाळा प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी चार महिन्यांपूर्वी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीने केली होती. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर लेझीम, लाठी काठी आणि मर्दानी खेळ खेळून लक्षवेधी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत घरफाळा घोटाळ्यासंदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत याबाबत कार्यवाही होत नाही तोपर्यंत विविध पातळीवर आंदोलन सुरू राहतील, असा इशारा कृती समितीने दिला.