कोल्हापूर : देशभरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध राज्यात हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. कोल्हापूरातल्या राधानगरीमध्ये सुद्धा असे एक गाव आहे जिथे हा सण आजही जवळपास एक आठवडा साजरा केला जातो. शिवाय हटके पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये असाही एक खेळ खेळला जातो जो कदाचित इतर कुठेही पाहायला मिळत नसेल. स्वच्छतेचा संदेश देणारा हा खेळ असून मोठ्या आनंदाने सर्व गावकरी हा खेळ खेळतात. कोणते आहे हे गाव आणि काय आहे नेमका खेळ पाहुयात या विशेष रिपोर्ट मधून
असाही आगळा वेळा स्वच्छतेचा संदेश : खरेतर स्वच्छतेचा संदेश देत होळी सण साजरा होताना शक्यतो कुठे पाहायला नाही मिळणार. मात्र, कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील लिंगाचीवाडी या गावात मात्र, स्वच्छतेचा संदेश देत होळी सण साजरा केला जातो. प्रत्येकाने आपल्या घराप्रमाणे अंगणातील परिसर स्वच्छ ठेवावा, असे यातून दाखवून देण्यात येते. अनेकजण घरात स्वच्छता ठेवतात, मात्र घरातील कचरा दारात आणून टाकतात. त्यामुळे असे न करता प्रत्येकाने आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवावा, असे सांगितले जाते. संपूर्ण गावात गावकरी एकत्र मिळून फिरतात. ज्यांच्या ज्यांच्या घरासमोर काही कचरा दिसत असेल तर, तो संपूर्ण कचरा त्यांच्या घरात नेऊन टाकला जातो. स्वच्छता किती गरजेची आहे याची जाणीव करून देण्याचाचा आगळा वेगळा खेळ गावातील सर्व मुले खेळत असतात. दरवर्षी अशा पद्धतीने सर्वजण हा सण साजरा करत असतात.
राधानगरीमध्ये पारंपारिक पद्धतीने होळी : सर्वत्र होळी मोठ्या उत्साहात साजरी होत असली तरी कोल्हापूरात काही तालुक्यात आजही जुन्या रूढी परंपरा जपत हे सण साजरे केले जातात. त्यापैकीच लिंगाचीवाडी हे एक छोटंसे गाव आहे. या गावात होळी सण विविध उपक्रमांनी आणि खेळ खेळून साजरा केला जातो. इथे निलगिरीच्या झाडीचा उंच असा मनाच्या पाच हाताचा खांब उभा केला जातो. त्याच्या भोवती शेनी रचून होळी पेटवली जाते. त्याला सगळ्या गावाचा नेवैद्य दाखवला जातो. सुखशांतीचे गाऱ्हाणे घालून या सणाची सुरवात होते. पुढे दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते. शेवटी सगळे गाव नदीवर आंघोळीसाठी जाते.